भारताने ऑपरेशन सिंदूर सुरू केल्यानंतर पाकिस्तानकडून सीमेवर गोळीबार केला जात आहे. यात फक्त लष्करच नव्हे तर नागरिक, दवाखाने आणि शाळा यांनाही लक्ष्य केलं जात आहे. पाकिस्तानच्या माऱ्याला भारतानेही चोख प्रत्युत्तर दिलं. पाकिस्तानच्या एअरबेसवर भारताने हल्ला केला. ऑपरेशन सिंदूरनंतर दोनच दिवसात पाकिस्तानने गुडघे टेकले असून भारताने हल्ले थांबवले तर आम्हीही संयम बाळगू असं पाकिस्तानने म्हटलंय. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक डार यांनी एका न्यूज चॅनलशी बोलताना नरमाईची भूमिका मांडलीय.
पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक डार यांनी शनिवारी दिलेल्या मुलाखतीत म्हटलं की, भारताने हल्ले थांबले तर तणाव कमी करण्याबाबत आम्ही विचार करू. दरम्यान, इशाक डार यांनी भारताला इशारासुद्धा दिला की, जर भारताने आणखी हल्ले केले किंवा स्ट्राइक केला तर आम्हीही त्याला प्रत्युत्तर देऊ.
पाकिस्तानमधील जिओ न्यूजशी बोलताना डार म्हणाले की, अमेरिकेचे सचिव मार्को रुबियो यांच्याशी बोलणं झालं. भारताशी बोलणं झाल्यानंतर त्यांनी मला फोन केला होता. त्यावेळी रुबियो यांनाही आम्ही आमची ही भूमिका सांगितली आहे. पाकिस्तानने असाही दावा केला की, भारताने आमच्या सहनशीलतेचा अंत पाहिल्यानं आम्ही प्रत्युत्तर दिलं. जर हे इथंच थांबलं तर आम्हीही हल्ले थांबवण्याचा विचार करू.