टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याने काही दिवसांपूर्वी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करत चाहत्यांना झटका दिला. त्यानंतर आता आणखी एक दिग्गज कसोटी क्रिकेटला अलविदा करणार असल्याचं म्हटलं जात आहे. रोहित शर्मा याच्यानंतर विराट कोहली निवृत्त होणार असल्याची चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगली आहे. काही दिवसांपूर्वी बीसीसीआयने विराटला टेस्ट रिटायरमेंटसाठी अल्टीमेंटम दिलं होतं, असा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला होता. त्यानंतर आता विराटच्या निवृत्तीची चर्चा रंगली आहे. मात्र विराटकडून अजून याबाबत कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
तर दुसऱ्या बाजूला टीम इंडिया लवकरच इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. भारत या दौऱ्यात 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. त्यामुळे विराटने निवृत्ती घेतली तर त्याच्या जागी कोण? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. विराटच्या जागी खेळण्यासाठी भारताकडे 3 प्रबळ दावेदार आहेत. मात्र त्यापैकी निवड समिती कुणावर विश्वास दाखवणार? हा देखील महत्वाचा प्रश्न आहे. देवदत्त पडीक्कल, करुण नायर आणि रजत पाटीदार हे तिघे विराटच्या जागेसाठी दावेदार आहेत. या तिघांची रेड बॉल क्रिकेटमधील कामगिरी जाणून घेऊयात.
टीम इंडियाकडून कसोटीत दोघांनीच त्रिशतक झळकावलं आहे. त्यापैकी एक म्हणजे करुण नायर. मात्र करुण नायर याला गेली अनेक वर्ष भारतीय संघात संधी मिळालेली नाही. करुण गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करत आहे.
करुणने 6 कसोटी सामन्यांमधील 7 डावांत 62.33 च्या सरासरीने 374 धावा केल्या आहेत. करुणची 303 ही सर्वोच्च धावसंख्या आहेत. करुणने 2016 साली इंग्लंड विरुद्ध चेन्नईच्या चेपॉक स्टेडियममध्ये हा कारनामा केला होता. मात्र त्यानंतर निवड समितीने करुणवर विश्वास दाखवला नाहीय. करुणता गेल्या काही महिन्यांमध्ये देशांतर्गत क्रिकेटमध्ये दबदबा पाहायला मिळत आहे. त्यामुळे निवड समिती करुणची ही कामगिरी आणि आकडेवारी पाहता इंग्लंड दौऱ्यासाठी त्याला संधी देणार का? हे पाहणं औत्सुकतेचं ठरणार आहे.
आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदार हा देखील विराटच्या जागी खेळण्यासाठी शर्यतीत आहे. देवदत्तने भारताचं आतापर्यंत 3 कसोटी सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलंय. मात्र रजतला आपली छाप सोडता आलेली नाही. रजतला 3 सामन्यांमध्ये 10.50 च्या सरासरीने 63 धावाच करता आल्यात.
रजत देशांतर्गत क्रिकेटमध्ये मध्य प्रदेशचं नेतृत्व करतो. रजतने डोमेस्टिक क्रिकेटमधील 68 सामन्यांमध्ये 13 शतकांच्या मदतीने 43.07 च्या सरासरीने एकूण 4 हजार 738 धावा केल्या आहेत.
देवदत्त पडीक्कल टीम इंडियाकडून 2 टेस्ट मॅच खेळला आहे. देवदत्तने 3 डावांत 30 च्या सरासरीने 1 अर्धशतकासह 90 धावा केल्या आहेत. तसेच देवदत्तने रणजी क्रिकेटमध्ये 43 सामन्यांमधील 71 डावात 57.81 च्या सरासरीने 2 हजार 815 धावा केल्या आहेत.देवदत्तने या दरम्यान 6 शतकं झळकावली आहेत.
दरम्यान विराटच्या निवृत्तीबाबत फक्त चर्चाच आहेत. मात्र विराटने तो निर्णय घेतला तर, या तिघांपैकी कुणाला संधी द्यायची? हे आव्हान निवड समितीसमोर असणार आहे.