IPL 2025 : विदेशी खेळाडूंनी युद्धबंदीनंतर उर्वरित हंगामात खेळण्यास नकार दिल्यास Bcci काय करणार?
GH News May 11, 2025 12:07 AM

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढत्या तणावामुळे आयपीएलचा उर्वरित 18 व्या मोसम आठवड्यासाठी स्थगित करण्याचा निर्णय शुक्रवारी 9 मे रोजी घेण्यात आला. दोन्ही देशातील वाढत्या तणावामुळे आणि युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने ही निर्णय घेतला गेला. मात्र आता भारत-पाकिस्तान या दोन्ही देशांच्या सहमतीने युद्धबंदीची घोषणा करण्यात आली आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून याबाबतची माहिती देण्यात आली आहे.त्यामुळे आता आयपीएल 2025 मधील उर्वरित हंगामाला केव्हापासून सुरुवात होणार? याची उत्सुकता क्रिकेट चाहत्यांना लागून आहे.

भारत-पाकिस्तान यांच्यातील परिस्थिती वाढण्याआधी आयपीएलच्या 18 व्या मोसमात यशस्वीरित्या 58 सामन्यांचं आयोजन करण्यात आलं. पंजाब विरुद्ध दिल्ली हा धरमशाळा येथे 8 मे रोजी आयोजित करण्यात आलेला 59 वा सामना थांबवण्यात आला. त्यानंतर स्टेडियममधील लाईट्स बंद केल्या गेल्या. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 9 मे रोजी आयपीएल 2025 आठवड्याभरासाठी स्थगित करण्याचा निर्णय झाला. मात्र आता दोन्ही देशात युद्धबंदीचा निर्णय झालाय. त्यामुळे आता लवकरच पुन्हा एकदा सामन्यांना सुरुवात होणार असल्याचं निश्चित झालंय. मात्र आता विदेशी खेळाडूंनी खेळण्यास नकार दिला तर बीसीसीआय कारवाई करणार का? असा प्रश्नही या सर्व प्रकारानंतर उपस्थित होत आहे.

बीसीसीआय काय कारवाई करु शकते?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, धरमशाळा येथे सामन्यादरम्यान एकाएकी झालेल्या सर्व प्रकारानंतर विदेशी खेळाडू घाबरले होते. तेव्हा सर्व परिस्थिती नियंत्रणात होती. मात्र सुरु असलेला सामना एकाएकी स्थगित करण्यात आला. त्यांतर लाईट्स बंद करण्यात आल्याने विदेशी खेळाडूंमध्ये भीतीचं वातावरण होतं. मात्र सर्व खेळाडूंना आणि इतर संबंधितांना सुरक्षितरित्या दिल्लीत आणलं गेलं.

त्यानंतर आता युद्धविरामानंतर लवकरच बैठक होऊन बीसीसीआय उर्वरित हंगामासाठी वेळापत्रक जाहीर करणार आहे. मात्र विदेशी खेळाडूंनी सहभागी होण्यास नकार दिला तर उर्वरित सामने होण्यात अडचणी येऊ शकतात. मात्र नियमांनुसार विदेशी खेळाडू तसं करु शकत नाही. तसं केल्यास बीसीसीआय त्या खेळाडूंवर कारवाई करु शकते.

नियम काय आहे?

आयपीएलच्या नव्या नियमानुसार, विदेशी खेळाडूने खेळण्यास नकार दिल्यास त्याला भविष्यात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. नियमानुसार, टीममध्ये निवड झाल्यानंतर माघार घेणाऱ्या खेळाडूवर 2 हंगांमासाठी बंदीची तरतूद आहे. त्यामुळे विदेशी खेळाडूंना उर्वरित सामन्यांमध्ये खेळावं लागणार, हे स्पष्ट आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.