India Pakistan Ceasefire: जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानचं पाणी तोडून मोठी कारवाई केली होती. यामध्ये सिंधू जल करार स्थगित करत भारतानं पाकिस्तानकडं जाणारं पाणी रोखलं होतं. पण आता दोन्ही देशांमध्ये युद्धविरामाची घोषणा करण्यात आली असून ती आजच संध्याकाळी ५ वाजल्यापासून लागूही झाली आहे. पण यामुळं भारतानं पाकिस्तानचं पाणी थांबवण्याचा घेतलेला निर्णयही मागे घेतला जणार का? जाणून घेऊयात नेमकं काय निर्णय झाला आहे.
दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं अगदी सुरुवातीला सिंधू जल कराराला स्थगिती दिली, त्यानंतर दोनच दिवसांपूर्वीच चिनाब नदीवरील हायड्रोपावर प्रोजेक्टच्या धरणाचे दरवाजे देखील उघडले होते, याद्वारे मोठ्या प्रमाणावर पाकिस्तानच्या दिशेनं पाणी सोडण्यात आलं. या पाण्यामुळं पाकिस्तानातील नदीच्या किनारी भागांमध्ये राहणाऱ्या लोकांना पूरस्थितीचा फटका बसू शकतो असंही सांगितलं जात होतं. पण अद्याप भारतानं सिंधू करार स्थगिच केलेला आहे.
दरम्यान, आज अमेरिकेच्या मध्यस्थीनं भारत आणि पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी करण्यात आली. याबाबतची माहिती भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मेस्त्री यांनी याबाबत पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. त्यांनी या पत्रकार परिषदेत स्पष्टपणे सांगितलं की, केवळ गोळीबार आणि हल्ल्यांबाबतच शस्त्रसंधीचा निर्णय घेण्यात आला आहे. इतर कुठल्याही प्रकारच्या मुद्द्यांवर यामध्ये चर्चा झालेली नाही. त्यामुळं भारतानं पाकिस्तानचं तोडलेल्या पाण्याचा निर्णय हा कायमच राहणार आहे.
तसंच परराष्ट्र मंत्रालयाच्या सुत्रांनी काही वेळानंतर हे स्पष्ट केलं की, पाकिस्तानच्या दिशेनं सोडण्यात येणारं सिंधू नदीचं पाणी आणि व्यापाराबाबत अद्याप कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळं या दोन्ही गोष्टींची स्थगिती ही कायम राहणार आहे.