महिला टी२० वर्ल्ड कप आशिया क्वालिफायरल २०२५ स्पर्धा सध्या थायलंडला सुरू आहे. या स्पर्धेत शनिवारी अनोखी गोष्ट घडली. शनिवारी (१० मे) बँकॉकला संयु्क्त अरब अमिराती (युएई) विरुद्ध कतार महिला संघात सामना झाला. या सामन्यात युएईने १६३ धावांनी विजय मिळवला. पण या सामन्यात तब्बल १० खेळाडू रिटायर्ड आऊट झाल्याचे दिसले.
या सामन्यात महिला संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण या सामन्यात पावसाची शक्यता होती. दरम्यान, युएईकडून कर्णधार इशा रोहित ओझा आणि तिर्था सतीश यांनी सलामीला फलंदाजी केली.
या दोघींनीही आक्रमक खेळताना दीडशतकी भागीदारी केली. इशाने शतकी खेळी केली, तर तीर्थाने अर्धशतक केले. त्यांनी १६ षटकात संघाला बिनबाद १९२ धावा करून दिल्या होत्या. पण पावसाची शक्यता असल्याने सामना लवकर संपवायची होती.
त्यामुळे इशा आणि तिर्था दोघीही आधी रिटायर्ड आऊट झाल्या. इशाने ५५ चेंडूत ११३ धावांची खेळी केली, तिर्थाने ४२ चेंडूत ७४ धावांची खेळी केली. त्यानंतर बाकीच्या ८ खेळाडूंनी मैदानात येऊन एकही चेंडू न खेळताना विकेट्स घालवल्या म्हणजेच रिटायर्ड आऊट झाल्या. म्हणजेच संपूर्ण संघ रिटायर्ड आऊट झाला.
त्यामुळे संघाचा धावफलक १६ षटकात सर्वबाद १९२ धावा असा दिसत होता. इतर ८ खेळाडू शून्यावर बाद होत्या. त्यामुळे असे पहिल्यांदाच झाले की महिला किंवा पुरुषांच्या दोन किंवा त्यापेक्षा अधिक खेळाडू रियायर्ड आऊट झाले आहेत.
दरम्यान, त्यानंतर युएई संघाने गोलंदाजीही चांगली करताना कतारच्या संघाला ११.१ षटकातच २९ धावांवर सर्वबाद केले. त्यांच्याकडून यष्टीरक्षक फलंदाज रिझफा एम्युनल हिलाच २० धावांची खेळी करता आली. त्याशिवाय अँजेलिन मेरने ५ आणि शाहरिन बहाद्दूरने २ धावा केल्या. या तिघींशिवाय कतारच्या इतर सात खेळाडू शून्यावर बाद झाल्या.
युएईकडून गोलंदाजी करताना मिशेल बोथाने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. केटी थॉम्पसनने २ विकेट्स घेतल्या. हिना होतचंदानी, कर्णधार इशा रोहित ओझा, इंदुजा नंदकुमार आणि वैष्णवी महेश यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
१५ खेळाडू शुन्यावर बादतथापि, दोन्ही संघांच्या मिळून १५ खेळाडू शुन्यावर बाद झाल्या. त्यामुळे एकाच आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात १५ खेळाडू शून्यावर बाद होण्याचीही ही पहिलीच वेळ ठरली.
या स्पर्धेत ९ संघ सहभागी झाले असून युएईने पहिले दोन्ही सामने जिंकून अव्वल क्रमांक मिळवलेला आहे. थायलंड आणि नेपाळ संघातील सामना पावसामुळे रद्द झाल्याने ते ३-३ गुणांसह दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत.