पंकज रोडेकर ः सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १० : ठाणे आणि आजूबाजूच्या शहरांमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे ठाणे शहर पोलिसांमार्फत नवीन सहा पोलिस ठाण्यांच्या निर्मितीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे; पण पाच महिन्यांपासून या प्रस्तावाला पोलिस महासंचालक कार्यालयाची मंजुरीच मिळाली नसल्याने कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे मोठे आव्हान पोलिस दलाला पेलावे लागत आहे.
ठाणे शहर पोलिस आयुक्तालय भिवंडी, कल्याण- डोंबिवली, उल्हासनगरपासून थेट अंबरनाथ-बदलापूर शहरांपर्यंत पसरलेले आहे. ही सर्व शहरे आणि एकूण ३५ पोलिस ठाणी पाच विभागात विभागली आहेत. प्रत्येक परिमंडळांमध्ये सरासरी सात पोलिस ठाणी आहेत. आयुक्तालयातील फक्त ठाणे शहरात दोन परिमंडळे अस्तित्वात आहेत. सर्वच शहरात नागरीकरण झपाट्याने वाढल्याने लोकसंख्या वाढली आहे. वाढत्या लोकसंख्येबरोबर गुन्हेगारीचा आलेख वाढत आहे. इतरही महत्त्वाच्या बाबी विचारात घेतल्यास काही पोलिस ठाण्यांचे विभाजन करून ठाणे पोलिस आयुक्तालयामध्ये सहा नवीन पोलिस ठाण्यांची निर्मिती करण्यात येणार आहे. या नवीन पोलिस ठाण्यांना मंजुरी मिळावी, यासाठी पोलिस आयुक्तालयाकडून पोलिस महासंचालक कार्यालयाला पाच महिन्यांपूर्वी प्रस्ताव पाठवला आहे. त्यात भिवंडी परिमंडळात तीन नवीन पोलिस ठाण्याच्या समावेश असून ठाणे शहर, कल्याण आणि उल्हासनगर या परिमंडळात प्रत्येकी एक-एक नवीन पोलिस ठाणे मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत; पण अद्याप प्रस्तावाला मंजुरी मिळाली नसल्याची माहिती ठाणे शहर पोलिस दलाचे अपर पोलिस आयुक्त (प्रशासन) श्रीकांत पाठक यांनी दिली आहे.
-------------------------------------------------
‘या’ पोलिस ठाण्याचे विभाजन
पोलिस ठाण्यांचे विभाजन करून नवीन पोलिस ठाण्यांची निर्मिती केली जाणार आहे. त्यामध्ये मुंब्रा पोलिस ठाण्याचे विभाजनातून दिवा पोलिस ठाण्याची निर्मिती केली जाणार आहे. तर, भिवंडीतील नारपोली पोलिस ठाण्याचे विभाजनानंतर दापोडे तर शांतिनगर आणि निजामपुरा पोलिस ठाण्याचे विभाजन करत वंजारपट्टी, भिवंडी शहर पोलिस ठाण्याचे विभाजन मानसरोवर पोलिस ठाणे तयार करण्याचा प्रस्ताव आहे. तसेच डोंबिवलीतील मानपाडा पोलिस ठाण्याचे विभाजनानंतर काटई आणि हिललाइन पोलिस ठाण्याचे विभाजनातून नेवाळी पोलिस ठाण्याची निर्मिती होणार आहे.
------------------------------------------
४१ पोलिस ठाणी होणार
- नवीन पोलिस ठाण्यांची निर्मिती करताना आवश्यक असणारी जागा महत्त्वाची बाब आहे. त्यानंतर कर्मचारी तसेच अन्य बाबी तपासल्या जातात. तसेच पाठवलेल्या प्रस्तावांमध्ये काही त्रुटी काढण्यात येतील. त्या त्रुटी पूर्ण केल्या जातील. नवीन पोलिस ठाण्यांना मंजुरी मिळेल.
- सद्यःस्थितीत ठाणे शहर पोलिस आयुक्तालयात एकूण ३५ पोलिस ठाणी कार्यान्वित आहेत. त्यातच वाढत्या लोकसंख्या आणि गुन्हेगारीच्या वाढत्या प्रमाणामुळे नवीन सहा पोलिस ठाण्यांचा समावेश झाल्यास शहर आयुक्तालयातील पोलिस ठाण्यांचा आकडा ४१ होणार आहे.