India Pakistan : भारतीयांच्या केसालाही धक्का लागणार नाही
esakal May 11, 2025 12:45 PM

जयपूर : पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यांमुळे राजस्थानच्या सीमाभागात नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण असले तरी भारतीय सशस्त्र दलांनी आकाशातच ड्रोन निष्प्रभ केल्यामुळे लोकांचा आत्मविश्वास बळावला आहे.

भारतीय लष्कराने पाकिस्तानचे ड्रोन हवेतच उडवून लावले आणि त्यामुळे सीमाभागातील जनतेच्या केसालाही धक्का लागणार नाही, असा विश्वास स्थानिक जनतेच्या मनात निर्माण झाला आहे.

पाकिस्तानने काश्मीरपासून ते राजस्थानच्या सीमाभागापर्यंत ड्रोन आणि क्षेपणास्त्र डागले जात आहेत. यासंदर्भात या भागात भारताकडून सातत्याने खबरदारी बाळगली जात आहे. ब्लॅकआउट आणि सायरन यासारख्या माध्यमातून नागरिकांना वेळीच सजग केले जात आहे.

काल रात्री राजस्थानच्या पश्चिम भागात पूर्णपणे अंधार पसरवण्यात आला आणि विशेषतः बारमेरमध्ये सतत सायरन वाजवून नागरिकांना सजग करण्यात आले. पहिला ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न काल रात्री जैसलमेरच्या पोखरण येथे झाला. यानंतर बाडमेर व जैसलमेरच्या अन्य भागांतही अशाच स्वरूपाचे हल्ले झाले.

परंतु भारतीय हवाई दलाच्या संरक्षण प्रणालीने सर्व ड्रोन हवेतच निष्प्रभ केले. जैसलमेरचे रहिवासी जालमसिंह म्हणाले, आम्ही दोन दिवसांपासून झोपलेलो नाहीत. काल रात्रीचा हल्ला हा सलग दुसऱ्या दिवशी झालेला ड्रोन स्वार्म हल्ला होता आणि तो भारतीय लष्कराने यशस्वीपणे थोपवला. त्यांच्या कुटुंबासह अनेकांनी ब्लॅकआउटच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले. सुरक्षित राहण्यासाठी आम्ही नियमांचे पालन करतो, असे त्यांची पत्नी बबिता यांनी सांगितले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.