जम्मू : भारत-पाकिस्तान संघर्षामुळे सीमेवरील तणाव अधिक तीव्र झाला असून सतत सुरू असलेल्या गोळीबारामुळे जम्मू भागातील किमान पाच जिल्ह्यांतील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले आहे. या गोळीबारात दोन दिवसांत १८ जणांचा मृत्यू झाला असून सुमारे ६० जण जखमी झाले आहेत.
जम्मू, राजौरी आणि सांबा जिल्ह्यांतील हजारो नागरिकांना मदत छावण्यांमध्ये हलवण्यात आले आहे. जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, उपमुख्यमंत्री सुरिंदर चौधरी आणि मंत्री सतीश शर्मा यांनी या भागातील मदत केंद्रांना भेट देऊन व्यवस्था पाहिल्या आणि नागरिकांना दिलासा दिला.
‘‘राजौरी-पूंच पट्ट्यातील आठ ते दहा हजार सीमेवरील रहिवाशांचे स्थलांतर करण्यात आले आहे,’’ अशी माहिती मंत्री सतीश शर्मा यांनी दिली. या नागरिकांना अन्न, वैद्यकीय सेवा आणि अन्य सुविधा पुरविल्या जात आहेत.
हा गोळीबार २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ ठिकाणी केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांनंतर सुरू झाला आहे. त्यानंतर पाकिस्तानकडून सतत तोफांचा मारा सुरू असून पूंच, मेंढर, मनकोट, नौशेरा, अखनूर, आरएस पुरा, अरनिया, सांबा, कठुआ आणि अन्य भागांत नागरी वस्तींचे मोठे नुकसान झाले आहे.
मुख्यमंत्री अब्दुल्ला यांनी मिश्रीवाला, नागबनी, बिश्नाह आणि थंडी खुही येथील मदत छावण्यांना भेट देत अधिकाऱ्यांना सतर्क आणि तत्पर राहण्याचे निर्देश दिले आहेत. पूंच, मेंढर, मनकोट, नौशेरा, लाम, बालाकोट, सुंदरबनी, अखनूर आणि आंतरराष्ट्रीय सीमेवरील गरखल-खौर, मर्ह, आरएस पुरा, अरनिया, सांबा, हिरानगर आणि कठुआ येथील नागरिकांचेही स्थलांतर करण्यात येत आहे.
राजस्थानातही खबरदारीच्या सूचनादरम्यान, राजस्थानमधील सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये पाकिस्तानकडून संभाव्य हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारीच्या सूचना (हाय अलर्ट) देण्यात आला आहे. बारमेरमध्ये इशारा देणारे ‘सायरन’ वाजवण्यात आले असून, पोलिसांनी गस्त वाढवली आहे.
बारमेर आणि जैसलमेरमधील बाजारपेठा बंद करण्यात आल्या असून, पोलिस वाहनांद्वारे जनतेला सतर्कतेचा इशारा दिला जात आहे. बिकानेर आणि श्रीगंगानगर जिल्ह्यांतही अशीच परिस्थिती असून, शुक्रवारी रात्री जैसलमेर आणि बाडमेरमध्ये पाकिस्तानकडून अनेक ‘ड्रोन’ हल्ल्याचा प्रयत्न झाला. भारतीय संरक्षण दलांनी हे ‘ड्रोन’ हवेतच निष्प्रभ केले.