Fact Check: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचं तुरुंगात निधन? काय आहे सत्य?
GH News May 11, 2025 01:06 PM

पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफचे नेते आणि पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा तुरुंगात मृत्यू झाल्याची बातमी शनिवारपासून सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरतेय. इम्रान यांची आयएसआयनेच तुरुंगात हत्या केली, असा दावा करणारी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तुरुंगात त्यांना विष देऊन मारण्यात आलंय, असं त्यात म्हटलं गेलंय. परंतु इम्रान खान यांच्या हत्येची बातमी खोटी असल्याचं स्पष्ट झालं आहे. ते तुरुंगात सुरक्षित आणि स्वस्थ आहेत, असा दावा पाकिस्तानी माध्यमांनी केला. परंतु या खोट्या बातमीच्या संदर्भात अद्याप पाकिस्तान किंवा तुरुंगाच्या अधिकाऱ्यांकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आली नाही.

शनिवारी सोशल मीडियावर पाकिस्तान सरकारची एक प्रेस रिलीज व्हायरल झाली. यामध्ये लिहिलं होतं, ‘माजी पंतप्रधान इम्रान खान यांचं न्यायालयीन कोठडीत निधन झालं आहे. अत्यंत दु:खाने आणि गांभीर्याने आम्ही याची पुष्टी करतो. या घटनेची सध्या सखोल चौकशी सुरू आहे.’ परंतु ही प्रेस रिलीज बनावट असल्याचं म्हटलं गेलंय. ‘इम्रान खान हे जिवंत आहे आणि सध्या तुरुंगात आहेत’, असं पाकिस्तान ऑब्झर्हरने त्यांच्या वृत्तामध्ये म्हटलंय.

इम्रान खान यांचा एक व्हिडीओसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये ते जखमी अवस्थेत दिसत असून गार्ड त्यांना घेऊन जात असल्याचं पहायला मिळतंय. परंतु व्हायरल झालेला हा व्हिडीओ 2013 मधील असल्याचं स्पष्ट झालंय. एका निवडणूक रॅलीमध्ये इम्रान खान हे फोर्कलिफ्टवरून पडून जखमी झाले होते. त्यावेळी टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, इम्रान खान हे स्टेजवर फोर्कलिफ्टने पोहोचताना 15 फूट खाली पडले आणि त्यांच्या डोक्याला मार लागला. आता जवळपास दहा वर्षांपूर्वीचा हा व्हिडीओ पुन्हा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामुळे नेटकऱ्यांमध्येही गोंधळ निर्माण झाला आहे.

दरम्यान शुक्रवारी 9 मे रोजी इम्रान खान यांच्या पक्षाने त्यांच्या सुटकेसाठी इस्लामाबाद उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. दीर्घकाळ नजरकैदेमुळे त्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होत आहे आणि भारतासोबतच्या सध्याच्या परिस्थितीमुळे त्यांच्या जीवाला धोका आहे, असं म्हणत मुख्यमंत्री केपी अली अमीन यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. भारतासोबतच्या सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेता त्यांना तात्काळ पॅरोल किंवा प्रोबेशनवर सोडण्यात यावं, अशीही मागणी त्यांनी केली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.