रुग्णालयांनो खबरदार! बिलासाठी मृतदेह अडवल्यास कारवाई
Marathi May 11, 2025 03:30 PM

बिलासाठी रुग्णालयांनी मृतदेह अडवून ठेवल्याच्या तक्रारींमध्ये वाढ होत असल्याने पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने शहरातील सर्व खासगी रुग्णालयांनी तंबी दिली आहे. कोणत्याही परिस्थितीत बिल भरले नाही म्हणून किंवा अन्य कोणत्याही कारणासाठी मृतदेह अडवून ठेवू नये, अशा सूचना करत मृतदेह अडवून ठेवल्यास संबंधित रुग्णालयांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा महापालिकेच्या आरोग्य विभागाने शहरातील सर्व खासगी रुग्णालयांना दिला आहे.

रुग्णालयात उपचारादरम्यान रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर बिलासाठी मृतदेह अडवला जात असल्याच्या तक्रारी मागील काही दिवसांपासून वाढत आहेत. बिल भरण्यास तयार असूनही केवळ बिलिंग करण्यासाठी कर्मचारी नसल्याने आठ तास मृतदेह अडवून ठेवल्याची घटना 25 एप्रिल रोजी पूना हॉस्पिटलमध्ये घडली होती. याप्रकरणी मृत रुग्णाच्या नातेवाईकांनी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे तक्रार केली होती. त्यानंतर महापालिकेच्या आरोग्य विभागात या प्रकरणी सुनावणी घेण्यात आली, तसेच गेल्या आठवड्यात शहरातील आणखी एका हॉस्पिटलने मृतदेह अडवून ठेवल्याचा प्रकार समोर आला होता. त्यानंतर आरोग्य विभागाने या रुग्णालयालाही नोटीस बजावली असून आरोग्य विभागाकडून या रुग्णालयांची चौकशी करण्यात येत आहे. खासगी रुग्णालयांविरोधात येणाऱ्या तक्रारींच्या पाश्र्वभूमीवर शहरात पुन्हा अशा प्रकारच्या घटना घडू नयेत, यासाठी आरोग्य विभागाने सर्व खासगी रुग्णालयांना पत्र पाठवले आहे. बॉम्बे नर्सिंग होम आणि महाराष्ट्र नर्सिंग होम कायद्याचे काटेकोर पालन करावे, अशा सूचना रुग्णालयांना देण्यात आल्या आहेत.

पैशांसाठी रुग्णालयाने मृतदेह

ताब्यात देण्यास नकार दिल्याच्या तक्रारी नातेवाईकांनी केल्या आहेत. नातेवाईकांकडून आलेल्या तक्रारींनुसार रुग्णालयांना नोटीस देण्यात आली आहे. प्राप्त झालेल्या तक्रारींची चौकशी करण्यात येत आहे, तसेच संबंधित रुग्णालयांना अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी बॉम्बे नर्सिंग होम आणि महाराष्ट्र नर्सिंग होम कायद्याचे पालन करावे, यासंदर्भात शहरातील सर्व खासगी रुग्णालयांना पत्र पाठवले असल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या प्रमुख डॉ. निना बोराडे यांनी सांगितले.

रुग्णालयांबाबत होणाऱ्या तक्रारी

पैशांसाठी मृतदेह अडवून ठेवला, रुग्णालयांकडून पैशांसाठी मृतदेह ताब्यात देण्यास विलंब केला, मृतदेह ताब्यात देण्यासंदर्भातील प्रक्रिया अतिशय संथ गतीने, उपचारादरम्यान रात्रीच्या वेळी रुग्णाचा मृत्यू झाल्यास बिल करण्यास कर्मचारी नसणे, बिल करण्यास विलंब लावणे, सरकारच्या योजनेंतर्गत उपचार असल्यास रुग्णाचा मृतदेह लवकर नातेवाईकांच्या ताब्यात दिला जात नाही.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.