भारताचा स्टार खेळाडू रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून काही दिवसांपूर्वी निवृत्तीची घोषणा केली. तो भारताच्या कसोटी संघाचा कर्णधारही होता. भारतीय संघाला २० जूनपासून सुरू होणाऱ्या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंडला जायचे आहे.
या इंग्लंड दौऱ्यापूर्वी रोहितने निवृत्तीचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे आता भारताचा कसोटीतील नवा कर्णधार कोण असणार, हे प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून विचारले जात आहेत. यासाठी काही नावंही समोर आली आहेत.
रोहितसोबत कसोटी संघाच्या उपकर्णधारपदाची धुरा सांभाळत होता. त्यामुळे बुमराहला कर्णधार करावं, अशी अनेकांची इच्छा होती. मात्र आता निवड समितीच्या मनात काहीतरी वेगळं असल्याचे समजत आहे.
पीटीआयने दिलेल्या रिपोर्टनुसार कसोटीचा नवा कर्णधार म्हणून २५ वर्षीय शुभमन गिलचा विचार करत आहेत. विराट कोहली हा देखील पर्याय होता. पण भविष्याचा विचार करता विराटकडे निवड समिती पुन्हा कर्णधारपद देण्यास उत्सुक नाही. गिलने आत्तापर्यंत ३२ कसोटी सामन्यांत ५ शतके आणि ७ अर्धशतकांसह १८९३ धावा केल्या आहेत.
सुत्राने दिलेल्या माहितीनुसार जसप्रीत बुमाराहचा कर्णधारपदासाठी विचार केला जात नाही, कारण त्याच्या फिटनेसची चिंता आहे. बुमराह गेल्या काही वर्षात अनेकदा दुखापतींमुळे महत्त्वाच्या स्पर्धांना मुकला आहे.
तो काही दिवसांपूर्वीच दुखापतीमुळे चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धाही खेळला नव्हता. त्यामुळे आता त्याच्या दुखापतीची जोखीम पत्करून बीसीसीआय त्याला कर्णधार करू इच्छित नाही.
याशिवाय बुमराहला उपकर्णधारपदावरूनही हटवले जाण्याची शक्यता आहे. सुत्राने सांगितले की 'जर बुमराह कर्णधार होणार नसेल, तर त्याला उपकर्णधारपद देण्यात काहीच अर्थ नाही.' आता उपकर्णधारपदासाठी यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतचा विचार होण्याची शक्यता आहे.
रिषभ कसोटी संघातील नियमित सदस्य असून त्याची परदेशातील कामगिरीही चांगली आहे. त्याने ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका या देशांमध्ये शतकेही केली आहेत. रिषभने आत्तापर्यंत ४३ कसोटी सामने खेळले असून ६ शतके आणि १५ अर्धशतकांसह २९४८ धावा केल्या आहेत.
केएल राहुल ३३ वर्षांच्या पुढे असल्याने त्याचाही विचार होण्याची शक्यता कमी आहे. आता इंग्लंड दौऱ्यासाठी लवकरच भारतीय संघाची घोषणा होऊ शकते. यावेळी नव्या कर्णधाराचीही घोषणा होण्याची शक्यता आहे.