जिल्ह्यात आवास प्लस सर्वेक्षणाला वेग
esakal May 11, 2025 08:45 PM

पालघर, ता. ११ (बातमीदार) : पंतप्रधान आवास योजना ग्रामीण टप्पा २ अंतर्गत पात्र कुटुंबांची निवड करण्यासाठी ‘आवास प्लस २०२४’ सर्वेक्षण सध्या जिल्ह्यात वेगाने सुरू आहे. जिल्ह्यात एकूण ११ हजार ४६५ कुटुंबांचे सर्वेक्षण ४ मेपर्यंत यशस्वी झाले आहे. यामध्ये १० हजार २४० सर्व्हे सहाय्यकांनी, तर १५५८ स्वयं-सर्व्हे लाभार्थ्यांनी केले आहेत. डहाणू तालुक्याने या मोहिमेत आघाडी घेतली असून, येथे आतापर्यंत २६०७ कुटुंबांचे सर्वेक्षण झाले आहे.
सर्वेक्षणाचा मुख्य उद्देश म्हणजे ग्रामीण भागातील घर नसलेल्या किंवा कच्च्या घरात राहणाऱ्या गरीब कुटुंबांना पक्के घर उपलब्ध करून देणे. या सर्वेक्षणाच्या माध्यमातून २०१८ नंतर वंचित राहिलेल्या पात्र कुटुंबांचा शोध घेऊन त्यांना नव्याने याद्यांमध्ये समाविष्ट केले जाते. पात्र नागरिकांनी आपल्या गावातील सर्वेक्षण पथकाशी संपर्क साधावा. स्वतःही ‘आवास प्लस २.०’ अॅपवरून स्वयं-सर्व्हे करू शकतात, अशी माहिती प्रकल्प जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालिका डॉ. रूपाली सातपुते यांनी दिली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी सर्व संबंधित ग्रामसेवक, ग्रामपंचायत अधिकारी यांना सर्वेक्षण नियोजनबद्ध आणि अचूक करण्याचे आदेश दिले आहेत. त्या अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या संबंधित विभागाने प्रत्येक तालुक्याच्या प्रगतीवर लक्ष ठेवत नियत वेळेत लक्ष्य पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

या तालुक्यांनी दर्शवली प्रगती
पालघर (२३००), मोखाडा (२२१२), विक्रमगड (२०६६), वाडा (१००४) या तालुक्यांनीही लक्षणीय प्रगती दर्शवली आहे. तर तलासरी (८१८), जव्हार (५३०) आणि वसई (२६१) याप्रमाणे सर्वेक्षण झाले आहे. संपूर्ण जिल्ह्यात एकूण २४१८ सर्वेक्षण रविवारी पार पडली. त्यातील मोठा वाटा डहाणू, विक्रमगड, मोखाडा, वाडा आणि पालघर या तालुक्यांचा होता.


पालघर जिल्ह्यातील सर्वेक्षण वेगाने सुरू असून, जिल्हा प्रशासन आणि पथकांची कार्यशैली समाधानकारक आहे. ज्या तालुक्यांमध्ये कामाची गती कमी आहे, तिथे लवकरच मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार आहे.
- मनोज रानडे, मुख्य कार्यकारी अधिकारी

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.