भारत-पाकिस्तान यांच्यातील तणाव कमी झाल्यानतंर आयपीएल 2025 ला पुन्हा केव्हा सुरु होणार? याची प्रतिक्षा प्रत्येक क्रिकेट चाहत्याला लागून आहे. बीसीसीआयकडून 9 मे रोजी शेजारी देशांमध्ये वाढलेल्या तणावानंतर आयपीएलचा 18 वा मोसम आठवड्यासाठी स्थगित करण्यात आला. मात्र आता सीजफायर झाल्यानंतर येत्या 16 ते 17 मे पासून कधीही आयपीएलच्या उर्वरित हंगामातील सामन्यांंचं आयोजन केलं जाऊ शकतं, असं मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटलं जात आहे. त्यानंतर टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. त्यामुळे इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाकडून कुणाला संधी मिळणार? याचीही उत्सुकता चाहत्यांना आहे. मात्र त्याआधी गेल्या अनेक वर्षांपासून कमबॅकच्या प्रतिक्षेत असलेल्या खेळाडूला निवड समितीकडून संधी मिळण्याची शक्यता आहे.
करुण नायर याला इग्लंड दौऱ्यासाठी संधी मिळणार असल्याचं म्हटलं जात आहे. करुण नायर याला गेल्या 8 वर्षांपासून टीम इंडियात संधी मिळालेली नाही. त्यामुळे करुण कमबॅकच्या प्रतिक्षेत आहे. करुणने या दरम्यानच्या काळात देशांतर्गत क्रिकेटमध्ये खोऱ्याने धावा केल्यात. करुणने गेल्या होम सीजनमध्ये शतकांवर शतकं झळकावत खोऱ्याने धावा केल्या. करुणनने रणजी ट्रॉफी, विजय हजारे ट्रॉफी या सारख्या अनेक स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली. त्यामुळे आता करुणला टीम इंडियात कमबॅकची संधी द्यावी, अशी मागणी क्रिकेट चाहत्यांकडून केली जात आहे.
टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यात एकूण 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. मात्र त्याआधी टीम इंडिया ए इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. टीम इंडिया ए विरुद्ध इंग्लंड लायन्स यांच्यात 2 सामने खेळवण्यात येणार आहेत. या 2 सामन्यांच्या मालिकेसाठी लवकरच इंडिया ए संघाची घोषणा करण्यात येणार आहे.
क्रिकबझच्या रिपोर्ट्सनुसार, निवड समिती करुण नायरला इंडिया ए संघात स्थान देणार आहे. बीसीसीआकडून या मालिकेसाठी 12 किंवा 13 मे रोजी टीम इंडिया ए ची घोषणा केली जाऊ शकते. त्यामुळे बीसीसीआय खरंच करुणला संधी देतं का? याकडे क्रिकेट वर्तुळाचं लक्ष असणार आहे.
करुण नायर याने गेल्या डोमेस्टिक सिजनमध्ये एकदिवसीय आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये मिळून एकूण 1 हजार 600 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. करुणने रणजी ट्रॉफीत 4 शतकांसह 893 धावा केल्या आहेत. तसेच करुणने विजय हजारे ट्रॉफीत सलग 5 शतकांसह 779 धावा केल्या. तसंच करुणने इंग्लंड काउंटी चॅम्पियनशीप स्पर्धेतील काही सामने खेळले होते. करुणने या स्पर्धेतही शतक ठोकलं होतं. त्यामुळे करुणच्या या मेहनतीचं चीज होणार का? हे येत्या काही दिवसांतच स्पष्ट होईल.