Operation Sindoor मध्ये १०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा अन्...; पत्रकार परिषदेत पुरावे दाखवत तिन्ही सैन्यदलाकडून मोठे खुलासे
esakal May 12, 2025 02:45 AM

२२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधील नऊ दहशतवादी लाँच पॅडना लक्ष्य करून अचूक हवाई हल्ले केले. या लष्करी कारवाईत १०० हून अधिक दहशतवादी मारले गेले. ज्यात अनेक वरिष्ठ दहशतवादी कमांडर होते. तसेच ३५ ते ४० पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू झाला आहे, असे रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत भारतीय लष्कराचे डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी ही माहिती दिली.

डीजीएमओने सांगितले की, मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांमध्ये मुदस्सर खास, हाफिज जमील, युसूफ अझहर, अब्दुल मलिक रौफ सारखे कुख्यात दहशतवादी होते. जे आयसी-८१४ विमान अपहरण आणि पुलवामा दहशतवादी हल्ल्यासारख्या प्रकरणांमध्ये सहभागी होते. भारतीय हवाई दलाची कारवाई शस्त्रक्रियात्मक, अचूक आणि पूर्णपणे नियोजित होती.

लेफ्टनंट जनरल घई म्हणाले की, २२ एप्रिल रोजी २६ निष्पाप नागरिकांची हत्या करण्यात आलेल्या क्रूरतेची तुम्हा सर्वांना माहिती आहे. देशाच्या सैनिकांवर आणि नागरिकांवर अलिकडेच झालेल्या हल्ल्यांमुळे हे स्पष्ट झाले आहे की आता दहशतवादाविरुद्ध आणखी एक कडक संदेश द्यावा लागेल. ऑपरेशन सिंदूरचे उद्दिष्ट दहशतवादाचे सूत्रधार आणि त्यांच्या पायाभूत सुविधा नष्ट करणे आहे. भारताचा संदेश स्पष्ट आहे की आता केवळ विधाने नाही तर लष्करी कारवाई हे दहशतवादाविरुद्धचे उत्तर असेल.

डीजीएमओच्या मते, हल्ल्यांदरम्यान, पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेचे उल्लंघन करण्याचा प्रयत्नही करण्यात आला. पाकिस्तानची प्रतिक्रिया भीती आणि गोंधळाने भरलेली होती. गावे, धार्मिक स्थळे आणि गुरुद्वारांना लक्ष्य करून त्यांची प्रतिक्रिया चुकीच्या दिशेने गेली हे सिद्ध झाले, ज्यामुळे अनेक निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला. या कारवाईत, भारतीय हवाई दलाने दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ला करण्यात प्रमुख भूमिका बजावली. तर भारतीय नौदलाने मोहिमेसाठी अचूक शस्त्र प्रणाली पुरवली. हवाई दलाची लढाऊ विमाने आकाशात तैनात राहिली आणि ऑपरेशन दरम्यान रिअल-टाइम देखरेख आणि लक्ष्यीकरण करण्यात आले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.