विराट कोहलीने निवृत्तीनंतर वापरलेल्या #269 चा अर्थ काय? जाणून घ्या
GH News May 12, 2025 09:07 PM

विराट कोहलीने 14 वर्षे कसोटी क्रिकेटला दिल्यानंतर निवृत्ती जाहीर केली आहे. विराट कोहली आपला शेवटचा कसोटी सामना 2025 मध्ये सिडनीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता. आतापर्यंत विराट कोहलीने 123 कसोटी सामन्यात 9230 धावा केल्या असून 30 शतकं ठोकली आहेत. त्याने सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्या निवृत्तीची घोषणा केली. यावेळी त्याने #269 वापरला. यामुळे अनेकांना या हॅशटॅगचा अर्थ कळला नाही. 269 हा कोहलीला देण्यात आलेला अधिकृत कसोटी कॅप क्रमांक आहे.म्हणजेच विराट कोहली कसोटी क्रिकेटमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारा 269 वा खेळाडू आहे. विराट कोहलीने कोहलीने जून 2011 मध्ये किंग्स्टन येथे वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी पदार्पण केले. तेव्हा त्याच्या डोक्यावर कॅप घालण्यात आली होती. त्या कॅपचा नंबर 269 होता. कसोटी क्रिकेटमध्ये लाला अमरनाथला 1 ही कॅप दिली गेली आहे. त्यानंतर कसोटी खेळाडूंना कॅप क्रमांक दिले जात आहेत.

विराट कोहलीने निवृत्तीच्या पोस्टमध्ये काय लिहिलं?

‘मी कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदा बॅगी निळी टोपी घातली त्याला 14 वर्षे झाली आहेत. खरे सांगायचे तर, या फॉरमॅटमध्ये मला असा प्रवास करावा लागेल याची मी कधीच कल्पना केली नव्हती. त्याने माझी परीक्षा घेतली, मला आकार दिला आणि मला असे धडे दिले जे माझ्या आयुष्यभर माझ्यासोबत राहतील. पांढऱ्या पोशाखात खेळणे ही एक खास अनुभूती असते. शांतपणे आठवण्याचे दिवस, दीर्घ खेळ पण कोणीही न पाहिलेले ते छोटे क्षण हे सर्व माझ्या आयुष्यात कायम राहतील.’ असं विराट कोहलीने लिहिलं.

‘या फॉरमेटपासून दूर जाणे सोपे नाही. पण आता योग्य वेळ दिसतेय. मी माझी सर्व शक्ती त्यात लावली. या खेळाने मला असे बरेच काही दिले जे मी अपेक्षा केली नव्हती. मला हा प्रवास खूप आठवेल. खेळाचे, माझ्या सहकाऱ्यांचे आणि मला प्रोत्साहन देणाऱ्या सर्वांचे आभार. मी माझ्या कसोटी कारकिर्दीकडे नेहमी हसतमुखाने पाहतो. #269, साइन ऑफ.’ अशाप्रकारे विराट कोहलीने निवृत्तीची घोषणा केली. यात पोस्टमध्ये #269 हे सर्वांचं लक्ष वेधून घेणारं राहिलं.

विराट कोहली वनडे संघाचा अजूनही भाग आहे. टीम इंडिया 2027 मध्ये वनडे वर्ल्डकप खेळणार आहे. त्यामुळे या संघात रोहित शर्मा आणि विराट कोहली असतील की नाही याबाबत साशंकता आहे. असं असलं तरी दोघांनी या फॉर्मेटमधून अद्याप तरी निवृत्ती घेतली नाही. त्यामुळे दोघंही वनडे वर्ल्डकपची तयारी करतील अशी भावना क्रीडाप्रेमींमध्ये आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.