ठाणे शहर, ता. १२ (बातमीदार)ः कोणतीही इमारत दीर्घकाळ टिकण्यासाठी तिचा पाया मजबूत असणे आवश्यक असते. त्याच प्रकारचे काम आरोग्यसेवा देणाऱ्या पारिचारिका करतात. त्यामुळे त्यांचे करावे तेवढे कौतुक कमी असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार म्हणाले. ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात आंतरराष्ट्रीय पारिचारिकादिनानिमित्तच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात जागतिक परिचारिकादिन सोमवारी (ता. १२) साजरा केला. कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी या वेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले. नर्सिंग कर्मचाऱ्यांच्या योगदानाचे कौतुक करत, रुग्णसेवेतील त्यांच्या अतुलनीय भूमिकेवर प्रकाश टाकला. कार्यक्रमात अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धिरज महंगाडे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. मृणाली राहूड, दंतशल्यचिकित्सक डॉ. अर्चना पवार, तसेच मुख्य अधिसेविका प्रतिभा बर्डे उपस्थिती होती. त्यांनी अनुभवातून नर्सिंग कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले, तर प्रतिभा बर्डे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून शुश्रूषा संवर्गातील कर्मचाऱ्यांनी उत्तम रुग्णसेवेची शपथ घेतली. रुग्णसेवा ही फक्त नोकरी नाही, तर एक जबाबदारी सेवा आहे, ही भावना जागवण्यात आली.
-------------------------------------
आरोग्यसेवेच्या सन्मानार्थ हा कार्यक्रम होता. यानिमित्ताने रुग्णालयातील परिचारिकांना नवीन ऊर्जा, टीमवर्कची भावना मिळाली आहे.
- डॉ. कैलास पवार, जिल्हा शल्यचिकित्सक, ठाणे