भिवंडी, ता. १२ (वार्ताहर)ः मुंबई-नाशिक महामार्गावरील वडपे गावच्या हद्दीतील रिचलँड कॉम्प्लेक्समधील २२ गोदामांना सोमवारी पहाटे आग लागली. या दुर्घटनेत कपडे, बूट, केमिकल, इलेक्ट्रॉनिकचे साहित्य जळाल्याने कोट्यवधींचे नुकसान झाले आहे.
भिवंडी तालुक्यातील ग्रामीण भागात असलेल्या गोदामांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या गोदामांना आग लागण्याच्या घटना सातत्याने घटत आहेत. वडपे गावच्या हद्दीतील रिचलँड कॉम्प्लेक्समधील तब्बल २२ गोदामांचे सोमवारी पहाटे लागलेल्या आगीत नुकसान झाले. भिवंडीसह कल्याण येथील चार अग्निशामक दलाच्या गाड्यांनी घटनास्थळी दाखल होताना आगीवर नियंत्रण मिळविण्याचे कसोशीने प्रयत्न सुरू केले; परंतु पाण्याची कमतरता असल्याने अग्निशमन दलाने तब्बल नऊ तासांनी आगीवर नियंत्रण मिळवले.
-------------------------------------------------------
आगीचे कारण अस्पष्ट
रिचलँड कॉम्प्लेक्समधील के.के. इंडिया पेट्रोलियम स्पेसियालिटीज प्रा.ली., कॅनन इंडिया प्रा.ली. कंपनी, ब्राईट लाइफ केअर प्रा.ली. कंपनी, होलिसोल प्रा.ली. कंपनी, एबॉट हेल्थकेअर प्रा.ली. कंपनी, डेकोरेशन साहित्य जळाले आहे. तसेच गोदामातील केमिकल प्रिंटिंग मशीन, प्रोटीन खाद्यपदार्थ, कॉस्मेटिकचे साहित्य, कपडे भस्मसात झाले आहेत. आगीचे कारण अजून अस्पष्ट असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही.