LIVE : ऑपरेशन सिंदूरमध्ये नेमकं काय काय घडलं? भारतीय सुरक्षा दलाने पत्रकार परिषदेत काय सांगितलं?
BBC Marathi May 12, 2025 11:45 PM
PIB

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी शनिवारी (10 मे) संध्याकाळी शस्त्रसंधीचा निर्णय घेतला गेला. मात्र, त्यानंतरही पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन झाल्याचा आरोप भारतानं केलाय. वाचा.

आज दिवसभरातील अपडेट इथे वाचा :

BBC

भारतीय हवाई दल, भारतीय नौदल आणि भारतीय सैन्य अशा तिन्ही सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत ऑपरेशन सिंदूरबाबत माहिती दिली.

भारतीय लष्कराने काय कारवाई केली याची माहिती लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी दिली.

'9 दहशतवादी तळांवर झालेल्या कारवाई 100 दहशतवादी ठार'

  • भारतीय सुरक्षा दलांनी 7 मे आणि 8 मे रोजी ऑपरेशन सिंदूर अंतर्गत 9 दहशतवादी तळांवर केलेल्या कारवाईत 100 हून अधिक दहशतवादी मारले गेले.
  • यात युसुफ अझर, अब्दुल मलिक रऊफ, मुदस्सीर अहमद यांचा समावेश आहे. त्यांचा आयसी 814 अपहरण आणि पुलवामा स्फोटात सहभाग होता.
  • 8 मे आणि 9 मे रोजीच्या रात्री पाकिस्तानने संपूर्ण सीमेवर ड्रोन आणि एअर क्राफ्टने हल्ले करत सैन्याच्या तळांना लक्ष्य करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.
PIB लेफ्टनंट जनरल राजीव घई

हवाई दलाने काय कारवाई केली?

एअर मार्शल ए. के. भारती यांनी सांगितले की,

  • भारतीय हवाई दलानं पाकिस्तानची लाहोरमधील रडार सिस्टीम उद्ध्वस्त केली. यातून आम्हाला पाकिस्तानला इशारा द्यायचा होता की, भारतीय सैन्य तयार असलो, तरी आम्हाला पाकिस्तानच्या सैन्याशी संघर्ष करायचा नाही, तर दहशतवाद्यांशी करायचा आहे.
  • 8 मे रोजी रात्री 10.38 वाजता पाकिस्ताननं श्रीनगरपासून नलियापर्यंत हल्ले केले. मात्र, भारतीय सुरक्ष दल पूर्ण तयार होतं. त्यामुळे त्यांना जे नुकसान करायचं होतं ते त्यांना करता आलं नाही.
  • 7 मे रोजी युएव्ही हल्ले झाले, मात्र 8 मे रोजी युकॅव्ह, युएव्हीची संख्या कमी होती आणि कॉटकॉप्टर्सची संख्या अधिक होती. याचा हेतू देखरेख ठेवणं किंवा नागरिकांना त्रास देणं असा असावा. हे सर्व मध्यरात्रीपर्यंत चाललं.
  • भारतीय हवाई दलानं सैन्य तळांना किंवा नागरिकांना नुकसान होणार नाही याची पूर्ण काळजी घेतली. मात्र, यातून त्यांना लढाई करायची होती हे स्पष्ट झालं. यानंतर भारतानंही पाकिस्तानच्या लष्करी तळांना लक्ष्य केलं.
  • लाहोरजवळून भारतावर ड्रोन हल्ले होत असतानाही पाकिस्ताननं लाहोरहून नागरी विमानांचं उड्डाण सुरू ठेवलं. त्यांनी केवळ देशांतर्गतच उड्डाणं सुरू ठेवली नाही, तर आंतरराष्ट्रीय उड्डाणंही सुरू ठेवली. हे फार असंवेदनशील होतं.
  • पाकिस्तानच्या या कृत्यामुळे भारतीय हवाई दलाला खूप काळजीपूर्वक कारवाई करावी लागली. त्यामुळे भारतीय हवाई दलाला काही अडचणींचा सामना करावा लागला. मात्र, आम्ही कोणत्याही नागरी विमानाला नुकसान होऊ दिलं नाही.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे निवेदन

"ऑपरेशन सिंदूर ही केवळ लष्करी कारवाई नव्हती, तर भारताच्या राजकीय, सामाजिक आणि धोरणात्मक इच्छाशक्तीचं प्रतीक आहे," असं मत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केलं.

रविवारी (11 मे 2025) उत्तर प्रदेशच्या लखनौमध्ये ब्राह्मोस इंटिग्रेशन अँड टेस्टिंग फॅसिलिटी सेंटरच उद्घाटन झालं. त्यावेळी ते बोलत होते. या कारवाईने दहशतवाद्यांच्या हल्ल्यात आप्तेष्ट गमावलेल्या कुटुंबांना न्याय मिळाला असंही ते म्हणाले.

X/rajnathsingh

राजनाथ यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे -

  • भारत दहशतवादाविरोधात कारवाई करतो तेव्हा दहशतवादी आणि त्यांच्या आकांसाठी सीमेपलिकडची भूमीही सुरक्षित नसते. ऑपरेशन सिंदूर हा त्याचा पुरावा आहे.
  • भारतात दहशतवादी हल्ला झाल्यास भारत काय करू शकतो, हे आता जगानं पाहिलं आहे.
  • भारताची कारवाई पीओकेमधील दहशतवादी तळं नष्ट करण्यासाठी होती, त्याठिकाणच्या नागरिकांना भारतानं लक्ष केलं नाही.
  • उलट पाकिस्ताननं भारतातील रहिवाशी भागांसह मंदिरं, गुरुद्वारा आणि चर्चवर हल्ल्याचे प्रयत्न केले. भारतीय लष्करानं त्यांना योग्य प्रत्युत्तर दिलं.
  • भारतीय लष्करानं सीमेलगतच्या पाकिस्तानच्या लष्करी तळांवर कारवाई केली. ते पाकिस्तानी लष्कराचं मुख्यालय असलेल्या रावळपिंडीपर्यंत पोहोचले.
  • ब्राह्मोस इंटिग्रेशन अँड टेस्टिंग फॅसिलिटी सेंटर संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर बनण्याच्या भारताच्या प्रयत्नांना बळकटी देईल. त्यातून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होईल.

लखनौमधील 200 एकरच्या ब्रह्मोस इंटिग्रेशन अँड टेस्टिंग फॅसिलिटी सेंटरमध्ये बूस्टर सबअसेम्ब्ली, एव्हिओनिक्स, प्रोपलंट, रामजेट इंजिन तयार होईल.

पाकिस्तानचा भारतावर आरोप

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी भारतानंच शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्याचं म्हटलं आहे. शस्त्रसंधीनंतरही त्याचं उल्लंघन केल्याच्या भारताच्या परराष्ट्र सचिवांच्या विधानाबाबतच्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी याबाबत माहिती दिली.

"भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या शस्त्रसंधीचं पालन करण्यासाठी पाकिस्तान कटिबद्ध आहे. भारताकडून काही भागांमध्ये शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जात आहे. आमचे सैन्य जबाबदारीने आणि संयमाने ही परिस्थिती हाताळत आहे," असं प्रवक्त्यांनी म्हटलं.

"शस्त्रसंधीची अंमलबजावणी करण्यासाठी निर्माण होणाऱ्या कोणत्याही समस्या योग्य पातळीवर संवादाच्या माध्यमातून सोडवायला हव्या. प्रत्यक्ष मैदानावर असलेल्या सैन्यानंही संयम बाळगावा," असंही मत त्यांनी मांडलं.

'ऑपरेशन अजूनही सुरू'

भारतीय हवाई दलानं X या समाज माध्यमावर पोस्ट करत म्हटलंय की, त्यांचं ऑपरेशन अजूनही सुरू आहे आणि वेळ आल्यावर अधिक माहिती दिली जाईल.

रविवारी (11 मे) दुपारी , "भारतीय हवाई दलानं ऑपरेशन सिंदूरमध्ये नेमून दिलेली कामं अचूक आणि व्यावसायिकपणे पार पाडली. राष्ट्रीय उद्दिष्टांनुसार ही कामं विचारपूर्वक आणि विवेकपूर्णपणे पद्धतीनं पार पाडण्यात आली.

ANI ऑपरेशन सिंदूरमध्ये नेमून दिलेली कामं अचूकपणे पार पाडल्याचं भारतीय हवाई दलानं म्हटलं आहे.

"ऑपरेशन अजूनही सुरू आहे, त्यामुळे अधिक माहिती नंतर दिली जाईल. चुकीच्या आणि प्रमाणित नसलेल्या माहितीचा प्रसार टाळावा, असं आवाहन भारतीय हवाई दल सर्वांना करत आहे."

पहलगाम हल्ल्यानंतर, भारताने 6-7 मे च्या मध्यरात्री पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये हवाई हल्ले केले होते, त्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला होता.

यानंतर दोन्ही देशांनी एकमेकांच्या लष्करी तळांवर हल्ला करण्याबद्दल माहिती दिली.

शनिवारी संध्याकाळी भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी शस्त्रसंधीची घोषणा केली.

डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारत-पाकिस्तानचं कौतुक

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी (11 मे) शस्त्रसंधीबद्दल भारत आणि पाकिस्तानचं कौतुक केलं.

ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर एका पोस्टमध्ये म्हटलं की, "मला भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांच्या मजबूत आणि दृढ नेतृत्वाचा खूप अभिमान आहे. त्यांनी योग्य वेळी शहाणपण आणि धैर्य दाखवत हा संघर्ष थांबवण्याचा निर्णय घेतला, कारण या संघर्षामुळे लाखो निष्पाप लोकांचा मृत्यू झाला असता आणि मोठे नुकसान होऊ शकले असते."

Getty Images डोनाल्ड ट्रम्प

ट्रम्प पुढे म्हणाले,"मला अभिमान आहे की अमेरिका तुम्हाला या ऐतिहासिक निर्णयापर्यंत पोहोचण्यास मदत करू शकली."

भारत आणि पाकिस्तानसोबत व्यापार वाढवण्याबद्दलही ट्रम्प यांनी या पोस्टमध्ये उल्लेख केला.

यासोबतच ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तानसोबत मिळून काश्मीर प्रश्नावर शांततापूर्ण तोडगा काढण्याबाबतही म्हटलं.

भारत-पाकिस्तान संघर्ष आणि 1971 मधील युद्धाच्या तुलनेवर शशी थरूर काय म्हणाले?

केरळमधील तिरुअनंतपुरमचे खासदार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धावर एएनआय या वृत्तसंस्थेशी संवाद साधला.

ते म्हणाले, "मला वाटतं की 1971चं युद्ध आपल्या इतिहासातील एक मोठी कामगिरी होती आणि एक भारतीय म्हणून मला त्याचा अभिमान आहे. इंदिरा गांधींनी उपखंडाचा नकाशा बदलला होता. पण त्यावेळी परिस्थिती वेगळी होती. आज पाकिस्तानची परिस्थिती वेगळी आहे. त्यांची लष्करी शस्त्रे, त्यांच्यामुळे होणारे नुकसान, सर्वकाही वेगळे आहे."

शशी थरूर म्हणाले की, 1971च्या युद्धाचं उद्दिष्ट बांगलादेशला मुक्त करणं हे होतं.

Getty Images शशी थरूर '...तोपर्यंत शाश्वत शांतता अशक्य'

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) चे अध्यक्ष आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी भारत-पाकिस्तान दरम्यान झालेल्या शस्त्रसंधीवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

आपल्या एक्स अकाउंटवर त्यांनी लिहिले आहे, "जोपर्यंत पाकिस्तान आपल्या भूमीचा वापर भारताविरुद्ध दहशतवादासाठी करत राहील, तोपर्यंत शाश्वत शांतता शक्य नाही."

"शस्त्रसंधी होवो किंवा न होवो, आपण पहलगाम हल्ल्यास जबाबदार असलेल्या दहशतवाद्यांचा पाठलाग थांबवू नये. जेव्हा जेव्हा बाहेरून आक्रमण झाले आहे, तेव्हा मी सरकार आणि सशस्त्र दलांच्या पाठीशी उभा राहिलो आहे. हे समर्थन कायम राहील," असं ओवैसी म्हणाले.

ANI असदुद्दीन ओवैसी

ओवैसी यांनी भारतीय सशस्त्र दलांच्या शौर्याचे कौतुक केले आणि या संघर्षात मरण पावलेल्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

तसंच, खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी शस्त्रसंधीची घोषणा ट्रम्प यांच्या वतीने झाल्याबद्दल भारत सरकारला प्रश्न विचारला.

अमृतसरमध्ये अजूनही रेड अलर्ट

पंजाबमधील अमृतसरमध्ये रात्री उशिरा सायरनचे आवाज ऐकायला मिळाले. त्यानंतर उपायुक्त साक्षी साहनी यांनी मार्गदर्शक सूचना जारी केल्या.

बीबीसीचे सहयोगी पत्रकार रविंदर सिंह रॉबिन यांच्या माहितीनुसार, सध्या अमृतसरमध्ये वीज सेवा पूर्ववत करण्यात आली आहे, पण जिल्हा अद्याप रेड अलर्टवर आहे.

साक्षी साहनी यांनी नागरिकांना आवाहन केलं आहे की, नागरिकांनी घराबाहेर पडू नये, आपल्या घरातच राहावं आणि खिडक्यांपासून दूर रहावं.

"जेव्हा परिस्थिती पूर्णपणे सुरक्षित होईल, तेव्हाच प्रशासनाकडून हिरवा सिग्नल दिला जाईल. कृपया घाबरू नका, शांतता राखा आणि प्रशासनाच्या सर्व सूचनांचे पालन करा," असंही त्या म्हणाल्या.

Getty Images

भारत आणि पाकिस्ताननं पूर्ण शस्त्रसंधीवर सहमती दर्शवल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये जाहीर केलं.

त्यानंतर काही वेळानं पाकिस्तानकडून या शस्त्रसंधीचं अनेकवेळा उल्लंघन झाल्याचं भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं स्पष्ट केलं.

शस्त्रसंधीचं पाकिस्तानकडून उल्लंघन - भारत

भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. शनिवारी रात्री अकराच्या सुमारास विक्रम मिस्री यांनी पत्रकार परिषद घेतली.

त्यात मिस्री यांनी म्हटलं, "भारत आणि पाकिस्तान यांच्यात काही तासांपूर्वी शस्त्रसंधी झाली होती, पण त्याचं पाकिस्तानकडून उल्लंघन होत आहे. त्यामुळे भारतीय सैन्यदलाकडून त्यांना चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे. ही अतिशय खेदाची गोष्ट आहे आणि याला पाकिस्तान जबाबदार आहे."

मिस्री पुढे म्हणाले, "पाकिस्तानने सद्यपरिस्थिती समजून घ्यावी आणि अशी घुसखोरी ताबडतोब थांबवावी.सैन्याला अशा परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी सांगितलं आहे. तसंच, पाकिस्तानने असं उल्लंघन टाळावं आणि परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घ्यावं."

MINISTRY OF EXTERNAL AFFAIRS, YOU TUBE भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री

त्याआधी जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी एक्स या समाजमाध्यमावर पोस्ट करत म्हटलं होतं की, "शस्त्रसंधीचं नेमकं काय झालं. संपूर्ण श्रीनगरमध्ये स्फोटाचे आवाज येत आहेत."

हा पाकिस्तानसाठी ऐतिहासिक विजय - शरीफ

मध्यरात्री पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी देशाला उद्देशून भाषण केलं.

"कोणी स्वातंत्र्याला आव्हान दिलं तर आम्ही आमच्या संरक्षणासाठी काहीही करू," असं म्हणत त्यांनी भाषणाची सुरुवात केली.

EPA/PTV पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ

पाकिस्तानवर विनाकारण आरोप केले जात असून, त्याची चौकशी व्हावी असं ते म्हणाले. गेल्या काही दिवसांत पाकिस्तावर ड्रोन हल्ले झाल्याचा आरोप त्यांनी केला. त्यात मशिदींचं नुकसान झालं असून निरपराध लोक मारले गेल्याचा आरोपही त्यांनी केला.

शरीफ यांनी पाकिस्तानच्या लष्करानं याचा कसा सामना केला याबाबतही माहिती दिली. "आपल्या मूल्यांचं रक्षण करण्यात देश यशस्वी झाला आहे. संपूर्ण पाकिस्तानी यशस्वी झाले आहे, आपण जिंकलो आहोत. हा विजय आहे," असं ते म्हणाले.

हा पाकिस्तानसाठी ऐतिहासिक विजय असल्याचं म्हणत शरीफ यांनी कौतुक केलं. त्यांनी पाकिस्तानच्या सैन्यातील अधिकाऱ्यांची नावं घेत त्यांचं अभिनंदन केलं. देशातील विरोधी पक्षांचेही शरीफ यांनी आभार मानले.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.