Pune News : पोकलेन यंत्राची बकेट डोक्यात लागल्याने कचरावेचक महिलेचा मृत्यू; पोकलेन चालकास अटक
esakal May 13, 2025 01:45 AM

पुणे - कचरा गोळा करणाऱ्या पोकलेन यंत्राची लोखंडी बकेट डोक्याला लागून झालेल्या अपघातात कचरावेचक महिलेचा मृत्यू झाला. हि घटना रविवारी (ता. ११) दुपारी बारा वाजता रामटेकडी येथील औद्योगिक वसाहतीमध्ये घडला. वानवडी पोलिसांनी पोकलेन चालकास अटक केली.

सुरेखा सुभाष काळे (वय-३०, रा. रामटेकडी, हडपसर) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी सुभाष काळे (वय-३८) यांनी वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी पोकलेन चालक अरविंद प्रभू पासवान (वय ३०, रा. रामटेकडी औद्योगिक वसाहत, रामटेकडी ) यास अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या पत्नी सुरेखा काळे या कचरावेचक होत्या. नेहमीप्रमाणे त्या रविवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास रामटेकडी येथील औद्योगिक वसाहतीमधील कचरा डेपो परिसरात परिसरात कचरा वेचत होत्या. त्याचवेळी तेथे अरविंद पासवान हा त्याच्या ताब्यातील पोकलेन यंत्राच्या सहाय्याने कचरा गोळा करण्याचे काम करत होता.

त्यावेळी पोकलेन यंत्राचे लोखंडी बकेट सुरेखा काळे यांच्या डोक्याला लागल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी तत्काळ खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेस जबाबदार असल्याने चालक पासवान यास तत्काळ अटक करण्यात आली. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक आशिष जाधव करत आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.