भारत-पाकिस्तानमधील तणावाचे वातावरण आता निवळले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी करत भारत-पाकिस्तानमध्ये सुरू असलेला संघर्ष थांबवला. अमेरिकेने दोन्ही देशांच्या लष्करांमधील सीमेवरील संघर्षाला विराम दिला. त्यानंतर केंद्रातील मोदी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले आहेत. तसंच विरोधकांनी संसदेच्या विशेष अधिवेशनाची मागणी केली आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाचे नेते आणि माजी संरक्षणमंत्री शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी भारत-पाक वादात अमेरिकेच्या हस्तक्षेपावर त्यांनी संताप व्यक्त केला.
संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याच्या विरोधकांच्या मागणीवर शरद पवार यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, 'मी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याच्या विरोधात नाही. पण हा एक संवेदनशील आणि गंभीर मुद्दा आहे आणि संसदेत इतक्या गंभीर विषयावर चर्चा करणे शक्य नाही. अशा परिस्थितीत राष्ट्रीय हितासाठी माहिती गुप्त ठेवणे आवश्यक आहे. विशेष अधिवेशन बोलावण्याऐवजी आपण सर्वजण एकत्र बसलो तर बरे होईल.'
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर देखील प्रतिक्रिया देताना शरद पवार यांनी सांगितले की, 'आतापर्यंत आम्ही आमच्या देशांतर्गत बाबींमध्ये कोणत्याही तिसऱ्या राष्ट्राला हस्तक्षेप करण्याची परवानगी दिलेली नाही. पण अमेरिकेचे अध्यक्ष यांनी आमच्या अंतर्गत मुद्द्यांबद्दल काही बोलण्याची ही पहिलीच वेळ आहे. भारत-पाकिस्तान यांच्यातील प्रश्नात अमेरिकेचा संबंध काय?, असा सवाल शरद पवारांनी उपस्थित केला आहे.
-पाक वादामध्ये अमेरिकेच्या मध्यस्थीवर शरद पवार पुढे म्हणाले की, 'शिमला करार हा भुत्तो आणि श्रीमती गांधी यांच्यात झाला होता. आमच्या देशाचे मुद्दे आम्ही सोडवू, आमचा विषय आम्ही सोडवू, इतरांनी त्यात नाक खूपसण्याचे कारण काय?' अशा शब्दात शरद पवारांनी अमेरिकेच्या हस्तक्षेपावर परखडपणे आपले मत मांडले आहे. 'आपल्या घरगुती वादात तिसऱ्या राष्ट्राचा हस्तक्षेप चालणार नाही. ही पहिलीच वेळ आहे. अमेरिकन अॅथोरिटीने पब्लिकली पुढे येऊन सांगितले हे ठीक नाही.', असे म्हणत शरद पवार यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या युद्धविरामाबाबतच्या ट्विटवर प्रतिक्रिया दिली.