आयपीएल 2025 स्पर्धेत 58 वा सामना अर्धवट थांबवण्यात आला आणि त्यानंतर स्पर्धा स्थगित केल्याची घोषणा करण्यात आली. ही स्पर्धा भारत पाकिस्तान यांच्यातील तणावपूर्ण स्थितीमुळे थांबवण्यात आली होती. पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना 8 मे रोजी अर्धवट थांबवण्यात आला होता. त्यामुळे इतर सामने कधी होतील हे मात्र निश्चित नव्हतं. पण आयपीएलचं वेळापत्रक नव्याने जाहीर करण्यात आलं आहे. 17 मे पासून या स्पर्धेला पुन्हा सुरुवात होणार आहे. तसेच 3 जून रोजी या स्पर्धेचा अंतिम सामना होणार आहे. यापूर्वी अंतिम फेरीचा सामना 25 मे रोजी होणार होता. मात्र आता या स्पर्धेचा अंतिम सामना 3 जून रोजी होणार आहे.
भारत पाकिस्तान तणावामुळे 9 मे पासून एका आठवड्यासाठी ही स्पर्धा थांबवण्यात आली होती. भारत पाकिस्तान या देशातील तणाव निवळल्यानंतर बीसीसीआयने उर्वरित सामन्यांचं नवं वेळापत्रक जाहीर केलं आहे. नव्या वेळापत्रकानुसार 17 मे पासून उर्वरित 17 सामन्यांचा खेळ सुरु होईल. सहा ठिकाणी उर्वरित सामने खेळवले जातील. बीसीसीआयने उर्वरित सामने बेंगळुरू, दिल्ली, लखनौ, मुंबई, अहमदाबाद आणि जयपूर या सहा ठिकाणी आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयने अद्याप प्लेऑफ सामन्यांसाठी ठिकाणे निश्चित केलेली नाहीत. बीसीसीआयने यावेळी भारतीय सशस्त्र दलांच्या शौर्याला सलाम केला. त्यांच्या प्रयत्नांमुळे क्रिकेटचे सुरक्षित पुनरागमन शक्य झाले आहे, असं बीसीसीआयने आपल्या निवदेनात म्हंटलं आहे.
आयपीएलने एका प्रेस रिलीज जारी करताना म्हटले की, ‘बीसीसीआयला टाटा आयपीएल 2025 पुन्हा सुरू झाल्याची घोषणा करताना आनंद होत आहे. एकूण 17 सामने 6 ठिकाणी खेळवले जातील. 17 मे पासून सुरू होतील आणि 3 जून रोजी अंतिम सामना होईल. नवीन वेळापत्रकात दोन डबल-हेडर सामने समाविष्ट आहेत. यावेळी दोन सामने रविवारी खेळवले जातील. प्लेऑफचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे.
आयपीएल 2025 स्पर्धेतील 58 वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स यांच्यात सुरु होता. मात्र हा सामना अर्धवट थांबवण्यात आला होता. पण आता 17 सामने होणार असल्याने हा सामना परत होईल असे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. हा सामना 24 मे रोजी जयपूरमध्ये होईल असं सांगण्यात येत आहे. हा सामना पुन्हा होणार असल्याने गुणतालिकेत बदल झालेला नाही.