सोलापूर : पतीच्या निधनानंतर आईला मिळणारी पेन्शन ती मावशी, मामा यांनाच देत होती. या रागातून पोटच्या मुलानेच आईच्या डोक्यात कुकरने जोरात मारून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी बिल्डिंग मालकाच्या फिर्यादीवरून मुलाविरूद्ध जेलरोड पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. हर्षल रामकृष्ण चिंचणसुरे (रा. भारत नगर, कुमठा नाका) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली आहे.
मुलाला नऊ महिने नऊ दिवस गर्भात वाढवून पुढे शिक्षण देऊन नोकरीलायक ज्या आईने बनविले, त्याच आईला काही रुपयांसाठी पोटच्या मुलानेच जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. संशयित आरोपी हर्षल चिंचणसुरे हा शिक्षण विभागात लिपिक म्हणून कामाला आहे. ९ मे रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास त्याने पेन्शनच्या कारणातून आईसोबत भांडण केले. पेन्शनची रक्कम आई नातेवाइकांनाच देत असल्याच्या रागातून त्याने घरातील कुकर आईच्या डोक्यात घातला. त्यात आई जागेवरच बेशुद्ध पडली. त्यानंतर त्याने मित्राला बोलावून घेतले. विजयालक्ष्मी रामकृष्ण चिंचणसुरे (वय ६३) यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पोलिसांनी यासंदर्भात रुग्णालयात जाऊन चौकशी केली. त्यावेळी नातेवाईक कोणीच नव्हते. पोलिसांनी अधिक तपास केला असता मुलानेच आईला जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची बाब समोर आली. त्यानुसार जखमी विजयालक्ष्मी चिंचणसुरे या ज्याठिकाणी राहायला आहेत, त्या इमारतीचे मालक अमित सुरेश धुपद (रा. सोमवार पेठ) यांनी जेलरोड पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी जखमीचा मुलगा हर्षल याला अटक केली.
आपण आईला सांभाळतो, तरीदेखील ती पेन्शनची रक्कम नातेवाइकांना देत असल्याच्या रागातून त्याने हे कृत्य केल्याचे समोर आले. हर्षल हा वडिलांच्या निधनानंतर अनुकंपा तत्त्वावर जिल्हा परिषदेच्या शिक्षण खात्यात लिपिक म्हणून नोकरीला लागला आहे. आता त्याच्यावर गुन्हा दाखल होऊन तो सध्या पोलिस कोठडीत आहे. त्यासंदर्भातील अहवाल पोलिस शिक्षण विभागाला पाठविणार आहेत. सहायक पोलिस निरीक्षक ज्योत्सना भांबिष्टे तपास करीत आहेत.