नागपूर : पोलिसांकडे तक्रार दिल्याचा कारणाने सातत्याने वाद घालणाऱ्या युवकाचा तिघांनी खून केला. ही घटना वनदेवीनगर चौकात गुरुवारी (ता.२२) दुपारी साडेतीन ते चार वाजताच्या सुमारास उघडकील आली. पोलिसांनी याप्रकरणी तिन्ही आरोपींना अटक केली.
सोहेल ऊर्फ चांद फिरोज शेख (वय २१, रा. वनदेवीनगर) असे खून झालेल्या युवकाचे नाव असून शेख शादाब शेख शहजाद ( वय २६, रा. वनदेवीनगर), शेख नौशाद शेख शहजाद (वय २८, रा. वनदेवीनगर), मोहम्मद सादिक अन्सारी मोहम्मद साबीद अन्सारी अशी आरोपींची नावे आहेत. तिघेही राशीद चिकन सेंटर येथे कामाला होते.
पोलिसांनी दिले्ल्या माहितीनुसार, सोहेल याच्यावर २०१६ साली केलेला चोरीचा गुन्हा दाखल आहे. काही महिन्यांपूर्वी सोहेल याच्याविरोधात यशोधरानगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलेली होती. ती तक्रार शेख शादाब, नौशाद आणि सादिक यांनी दाखल केली असे सोहेलला वाटत होते. त्यामुळे तो सातत्याने तिघांशीही वाद घातल होता. दरम्यान यातून तो त्यांचा खून करेल अशी भावना तिघांचाही मनात होती.
दरम्यान आज दुपारी तो परिसरात आला. त्याने नेहमीप्रमाणे तिघांनाही शिविगाळ करून त्यांना माझ्याविरोधात तक्रार का दाखल केली अशी विचारणा करू लागला. सुरुवातीला सोहेल दारूच्या नशेत असल्याने त्याच्याकडे तिघांनीही दुर्लक्ष केले. त्यानंतर तो पुन्हा शिविगाळ करू लागल्याने तिघांनीही त्याच्यावर सपासप वार करून त्याला रक्ताच्या थारोळ्यात लोळविले. दरम्यान याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक रमेश खुणे यांना मिळताच, त्यांनी ताफ्यासह परिसरात दाखल होऊन तिघांनाही अटक केली.
चार दिवसात दोन खूनयशोधरानगरात गेल्या चार दिवसात दोन खून झालेले आहेत. १८ मे रोजी कुख्यात गुंडाचा दुसऱ्या गुन्हेगाराने खून केला होता. त्यात पोलिसांनी सुनील सारंगपुरे यास अटक केली होती. दरम्यान आज पुन्हा परिसरात तिघांनी युवकाचा खून केला.