IPL 2025 SRH vs RCB : हैदराबाद बंगळूरलाही धक्का देणार? लखनऊमध्ये होणाऱ्या सामन्यात कोहलीवर लक्ष
esakal May 23, 2025 04:45 PM

Rain Pushes RCB vs SRH Clash to Lucknow as Virat Kohli Returns After Test Retirement : आयपीएलच्या बाद फेरीतील चारही संघ निश्चित झाल्यामुळे आता पहिल्या, दुसऱ्या स्थानावर कोण राहणार याची चुरस वाढली आहे. बंगळूर संघाने हैदराबादविरुद्ध आज होणाऱ्या सामन्यातून हेच लक्ष्य बागळले आहे, मात्र हैदराबादचा संघ त्यांनाही धक्का देणार का, याची उत्सुकता असेल.

२०१६ नंतर बंगळूरला गुणतक्त्यात कधीही पहिले स्थान मिळवता आलेले नव्हते. त्या मोसमात त्यांचा संघ उपविजेता राहिला होता. यंदाच्या स्पर्धेत बंगळूरने १२ सामन्यांतून १७ गुणांची कमाई केली आहे. उरलेले दोन्ही सामने जिंकले, तर त्यांना किमान दुसरे स्थान मिळू शकेल.

आज हैदराबादविरुद्ध होणारा हा सामना बंगळूरमध्ये नियोजित होता, परंतु बंगळूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून तुफानी पाऊस पडत आहे आणि पुढेही काही दिवस तसेच वातावरण राहण्याची शक्यता असल्यामुळे हा सामना लखनऊ येथे हलवण्यात आला.

स्थगित झालेली आयपीएल १७ मेपासून सुरू झाली, परंतु १७ तारखेचा बंगळूरचा कोलकाताविरुद्धचा बंगळूरमधील सामना पावसामुळे होऊ शकला नव्हता. बंगळूरचा संघ त्यांचा अखेरचा सामना ३ मे रोजी खेळला होता. त्यामुळे मोठ्या विश्रांतीनंतर पुन्हा त्याच लयीत खेळ करण्याचे त्यांच्यासमोर आव्हान असेल.

निवृत्तीनंतर मैदानात

कसोटीमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर विराट कोहलीला खेळण्याची संधी मिळाली नव्हती. आता आज तो कसोटीतील निवृत्तीनंतर प्रथमच मैदानात उतरेल. या आयपीएलमध्ये विराटने ११ सामन्यांतून सात अर्धशतके केली आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.