Maharashtra Live Updates : कितीही मशाली पेटवल्या तरी त्यांच्या हृदयात कायम घड्याळ
Sarkarnama May 23, 2025 10:45 PM
IMD Monsoon Update : यंदा मान्सून वेळेआधीच केरळमध्ये पोहोचण्याची शक्यता

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, यंदा मान्सून वेळेआधीच केरळमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे. विभागानं सांगितलं आहे की, सध्या हवामान मान्सूनसाठी पोषक होत चाललं असून, 25 मेच्या आसपास मान्सून केरळच्या किनारपट्टीवर दाखल होऊ शकतो.

मागील वर्षी मान्सूनने 30 मे रोजी केरळमध्ये एन्ट्री केली होती. मात्र यंदा तो तब्बल पाच दिवस आधी पोहचण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, 2009 नंतर प्रथमच मान्सून इतक्या लवकर केरळमध्ये दाखल होणार आहे.

कितीही मशाली पेटवल्या तरी त्यांच्या हृदयात कायम घड्याळ

के. पी. पाटील यांनी कितीही मशाली पेटवल्या तरी त्यांच्या हृदयात कायम घड्याळ राहिलं आहे. घरातला माणूस काही दिवस घराच्या बाहेर राहिले पण हा माणूस पुन्हा घरात आला की जो आनंद होतो तसाच आनंद आज झाला आहे, असे म्हणत अजित पवार यांनी माजी आमदार के.पी पाटील यांच राष्ट्रवादी पक्षात स्वागत केले.

राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे शिवाजीनगर कोर्टात

राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना शिवाजीनगर कोर्टात आणण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर कोर्टाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

फक्त टाईट कपडे घालून चालणार नाही, प्रफुल पटेलांक़डून राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची कानउघडणी

नागपूर : राज्यात आपण सत्तेवर आहोत. विदर्भातून सहा आमदार निवडूण आले आहे. यानंतरही पक्ष वाढत नाही याला जबाबदार कोण? अशी विचारणा करत राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष, खासदार प्रफुल पटेल यांनी विदर्भातील पदाधिकाऱ्यांना चांगलेच फटकारले.

फक्त टाईट कपडे घालून फिरता असे चालणार नाही. कोणी किती क्रियाशिल सदस्यांची नोंदणी केली याची आकडेवारी आपल्याकडे आहे. तुम्हाला जिल्ह्यात 10 लोकं सापडत नसतील आणि पक्षाचे बेसिक कामही करत नसला तर पक्ष कसा वाढणार? तुमच्या निष्ठेवर कसा विश्वास ठेवायचा अशी विचारणा त्यांनी जाहीरपणे केली.

खासदार सुप्रिया सुळेंची मोठी घोषणा; हुंडामुक्त महाराष्ट्रासाठी राज्यव्यापी लढा उभारणार

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी हुंडामुक्त महाराष्ट्रासाठी राज्यव्यापी लढ्याचा निर्धार व्यक्त केला आहे. "महाराष्ट्राची लेक स्व. वैष्णवी कस्पटे - हगवणे हिचा अतिशय वेदनादायक पद्धतीने हुंडाबळी झाला ही घटना मनाला प्रचंड वेदना देणारी घटना आहे. ज्या राज्याने स्त्री-मुक्तीच्या दृष्टीने देशाला दिशा दाखविण्याचे काम केले तेथे वैष्णवीसारख्या लेकीचा बळी जाणे हे अतिशय संतापजनक आहे. पण केवळ संताप आणि दुःख व्यक्त करून भागणार नाही, तर जोरदारपणे कृतिशील जागृतीचे पाऊल उचलावे लागेल, असेही सुळे यांनी म्हटलं.

वैष्णवीच्या आई-वडिलांची हगवणे कुटुंबावर मकोका लावण्याची मागणी; CM फडणवीस म्हणाले...

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचा माजी पदाधिकारी राजेंद्र हगवणे आणि त्यांच्या कुटुंबीयांकडून होणाऱ्या मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून त्यांची सून वैष्णवी हगवणे हिने आत्महत्या केल्याने राज्यात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील सर्वच आरोपींना अटक करण्यात आली आहे. आता या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मकोका लावण्याकरता काही नियम आहेत. त्या नियमात बसले तर हगवणे कुटुंबावरही मकोका लागू शकेल. पण, ते त्या नियमांत बसतात की नाही, याविषयी आजकाही सांगता येणार नाही, असं म्हटलं आहे.

वैष्णवीच्या सासरे अन् दिराला बेड्या; भाजपच्या चित्रा वाघ यांची CM फडणवीसांकडे केली मोठी मागणी

वैष्णवी हगवणेचे सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांच्या अटकेनंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मोठी मागणी केली आहे. वाघ म्हणाल्या, क्रुरकर्मा हरामखोरांना मरेपर्यंत फाशी द्या. तसेच या प्रकरणात सरकारकडून चांगले वकील उभे राहतील फास्टट्रॅकवर हे प्रकरण चालेल. हगवणे कुटुंबाला असा धडा शिकवला जाईल की पुन्हा कोणी लेकी-बाळीला हात लावायचा विचार करणार नाही, असंही त्यांनी म्हटलं.

...पण मी भाजपचा मंत्री नाही! राष्ट्रवादीच्या छगन भुजबळांचं मोठं विधान

छगन भुजबळ मंत्री कोणामुळे झाले याबाबत वेगवेगळे दावे केले जात आहे. याबाबत मंत्री छगन भुजबळ म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपल्यासाठी आग्रही होते हे खरे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीसुद्धा प्रयत्न केले. असे असले तरी मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून मंत्री झालो आहे. मी भाजपचा मंत्री नाही, असे स्पष्ट करून त्यांनी टीका करणाऱ्यालाही उत्तर दिले.

हवामान विभागाकडून मोठी अपडेट! कोकण,मराठवाड्यासह विदर्भातही मुसळधार पावसाची शक्यता

भारतीय हवामान विभागाकडून शुक्रवारी(ता. 23 मे) महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये 30 ते 40 किमी प्रतितास वेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्यांसह मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. याच पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचा तसेच आवश्यक खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

फडणवीसांकडून शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज

शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुड न्यूज दिली आहे. आता शेतरस्त्याची किमान रुंदी ३ मीटर असणार आहे, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. प्रत्येक शेतरस्ताप्रकरणाचा निर्णय ९० दिवसांत देणं बंधनकारक आहे, शेतरस्त्याची नोंद आता ७/१२ च्या ‘इतर हक्कां’मध्येच होणार असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.

सहा जूनचा शिवराज्याभिषेक सोहळा कायमस्वरूपी बंद करा: भिडे गुरुजी

Kolhapur News: सहा जूनचा शिवराज्याभिषेक सोहळा कायमस्वरूपी बरखास्त करायला पाहिजे, असे मत संभाजी भिडे गुरुजी यांनी व्यक्त केले आहे. ते कोल्हापुरात बोलत होते. शिवराज्याभिषेक सोहळ्याचा राजकारणासाठी वापर होत आहे. तिथीप्रमाणेच छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्व कार्यक्रम पार पडले पाहिजेत, असे ते म्हणाले. रायगडावरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा काढायला नको, या कुत्र्याचं राजकारण करू नका. वाघ्या कुत्र्याबद्दल जे इतिहास संशोधक बोलतात ते कोणत्या उंचीचे आहेत, हे तपासले पाहिजे, असे भिडे म्हणाले. याबाबत एक स्वतंत्र इतिहास संशोधक मंडळ स्थापन करून त्याबाबत निर्णय घ्यावा, अशी सूचना त्यांनी केली.

राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना वैष्णली हगवणे मृत्यू प्रकरणी सातव्या दिवशी पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांना आज (गुरुवार) पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास एक सापळा रचून ताब्यात घेण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुलगी आणि सून यात फरक करणाऱ्यांना इशारा दिला आहे.

हगवणे बाप-लेक फरार असताना कोल्हापूर, पवनानगर ,तळेगाव, स्वारगेट परिसरात

वैष्णवी हगवणे प्रकरणातील आरोपी सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे हे फरार असताना पवनानगर ,तळेगाव ,स्वारगेट परिसरात फिरत होते, याबाबतचे सीसीटीव्हीचे फुटेच पोलिसांच्या हाती लागले आहे. राजेंद्र हगवणे व सुशील हगवणे बावधनच्या मुहूर्त लॉन्स ,कोल्हापूर, पवनानगर ,तळेगाव ,स्वारगेट या भागात फिरत असल्याचे आढळले आहे.

हगवणे पिता पुत्रांना राजकीय पाठबळ - सुषमा अंधारे

वैष्णवीच्या आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी राजेंद्र हगवणे आणि त्यांचे पुत्र सुशील हगवणे यांना अटक केली आहे. पोलिसांनी त्यांना अटक केली की त्यांची स्वतः होऊन सरेंडर केले हे स्पष्ट होऊ शकले नाही. त्यांनी जर सरेंडर केले असेल तर त्यांना राजकीय पाठबण आहे, असा दावा सुषमा अंधारे यांनी केला आहे.

राजेंद्र हगवणेंना दुपारी दोनला कोर्टात हजर करणार

बावधन पोलिसांनी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेला अटक केल्यानंतर स्टेशन डायरी नोंद केली. राजेंद्र हगवणे व सुशील हगवणे ला शिवाजीनगर कोर्टात दुपारी दोन वाजता हजर करण्यात येणार आहे. राजेंद्र व सुशील ला कोणी मदत केली. ते कुठल्या ठिकाणी लपून बसले होते त्याचा शोध घ्यायचा आहे अशी अनेक कारणावर पोलिस मागणार रिमांड मागणार आहेत.

धुळे कॅश प्रकरणात कक्ष अधिकारी किशोर पाटील निलंबित

धुळे कॅश प्रकरणात एसआयटी नेमण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. दरम्यान, या प्रकरणात कक्ष अधिकारी किशोर पाटील यांना निलंबित करण्यात आले आहे. किशोर पाटील यांच्या नावाने विश्रामगृहातील खोली बूक होती. या खोलीमध्ये तब्बल एक कोटी 84 लाखांची रोकड सापडली आहे.

Vaishnavi Hagawane Death : वैष्णवी मृत्यू प्रकरणी राजेंद्र हगवणे अन् सुशील हगवणेंना अटक

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना आज (शुक्रवार) पहाटे पहाटे 4.30 वाजता पोलिसांकडून अटक करण्यात आली.सात दिवसांपासून राजेंद्र आणि सुशील फरार होते. मिळालेाल्या माहिनुसार हे दोघे स्वतःहून पोलिसांच्या समोर हजर झाले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.