जयपूरमध्ये मिठाईच्या दुकानांमध्ये काही गोड पदार्थांची नावं बदलण्यात आली आहेत. पाकिस्तानकडून दहशतवादी हल्ल्यांचं होणारं समर्थन आणि पाकच्या कुरापती यामुळे मिठाईच्या नावातला पाक हा शब्द काढून त्या ऐवजी श्री आणि भारत असे शब्द जोडण्यात आले आहेत. जयपूरमधील अनेक मिठाई दुकानदारांनी ज्या पदार्थांच्या नावात पाक शब्द आहे त्या पदार्थांची नावे बदलली आहेत.
ऑपरेशन सिंदूरनंतर सातत्यानं भारतीय नागरिकांकडून पाकिस्तानशी संबंधित गोष्टींवर बहिष्कार टाकला जात आहे. त्यातच आता जयपूरमध्ये मिठाईच्या दुकानांवर गोड पदार्थांमधून पाक शब्द काढून टाकण्यात आलाय. जयपूरमधील त्योहार स्वीट्स दुकान हे चविष्ट आणि महाग गोड पदार्थांसाठी प्रसिद्ध आहे. या दुकानात पदार्थांची नावं बदलण्यात आली आहेत.
त्योहार स्वीट्सने सांगितलं की, आमच्याकडे तयार होणारे स्वर्ण भस्म पाक, मोती पाक, आम पाक, गोंद पाक, म्हैसूर पाक यांसारख्या गोड पदार्थांची नावं बदलली आहेत. ज्या ज्या पदार्थांच्या नावात पाक आहे त्यांची नावं बदलून त्यात श्री आणि भारत शब्द समाविष्ट केलाय.
देशभक्ती फक्त सीमेवरच नाही तर प्रत्येक नागरिकात असायला हवी. यासाठी आम्हीही लहानसा प्रयत्न म्हणून गोड पदार्थांच्या नावातला पाक शब्द काढला आहे. इथल्या मिठाईलासुद्धा देशभक्तीचा गोडवा असेल असं त्योहार स्वीटने म्हटलंय.
मोती पाक आता मोतीश्री तर म्हैसूर पाक म्हैसूरश्री नावाने विकला जाणार आहे. त्योहार स्वीट्समध्ये स्वर्ण भस्म पाक आणि चांदी भस्म पाक हे सर्वात महागडे गोड पदार्थ आहेत. त्यांचीही नावे बदलून त्याला श्री जोडण्यात आलं आहे. पदार्थांच्या नावात श्री असेल तर ऐकायलासुद्धा बरं वाटेल असं त्योहार स्वीटच्या मालकांनी म्हटलंय.