भारत-पाकिस्तानमध्ये तीन दिवस चाललेल्या सैन्य संघर्षानंतर आता सीजफायर झाला आहे. सीमेवर आता शांतता आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात अनेक निर्णय घेतले आहेत. त्यामुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. दोन्ही देशांमध्ये सध्या तणावपूर्ण संबंध असले, तरी भारत दया दाखवेल अशी अपेक्षा पाकिस्तान बाळगून आहे. सिंधू जल करार स्थगित करण्याच्या निर्णयाचा भारताने फेरविचार करावा, अशी विनंती पाकिस्तानातून होत आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ला 22 एप्रिल रोजी झाला होता. त्यानंतर भारत सरकारने तात्काळ पाकिस्तान विरोधात कठोर निर्णय घेतले. त्यांचा दूतावासातील स्टाफ कमी केला. भारतात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द केले. सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे सिंधू जल करार स्थगित करण्याचा निर्णय. याचे प्रभावी परिणाम अजून काही काळाने दिसतील. पहिल्यांदाच भारत सरकारने सिंधू जल करार स्थगित केला आहे. या निर्णयामुळे पाकिस्तानी जनता आणि तिथलं सरकार टेन्शनमध्ये आहे.
मुहम्मद औरंगजेब काय म्हणाले?
“भारतासोबत सुरु असलेल्या संघर्षामुळे पाकिस्तानच्या आर्थिक स्थितीवर खास काही फरक पडणार नाही. त्यामुळे आर्थिक आढावा घेण्याची आवश्यकता नाही” असं पाकिस्तानचे अर्थ मंत्री मुहम्मद औरंगजेब एका मुलाखतीत म्हणाले.
औरंगजेब यांना काय अपेक्षा?
पाकिस्तानात वाहून जाणार पाणी रोखल्यामुळे त्यांची हालत खराब होऊ लागली आहे. भीषण गर्मी दरम्यान पाण्याची मागणी वाढू शकते. पाण्याच्या संभाव्य समस्येवरुन पाकिस्तानचे अर्थ मंत्री औरंगजेब यांनी भारत सरकारला विनंती केली आहे. “भारताने एकतर्फी निर्णय घेत सिंधू जल करार स्थगित केला. मला अपेक्षा आहे की, हा करार पुन्हा बहाल होईल” असं औरंगजेब यांनी म्हटलं आहे. भारताने करार निलंबित केल्यामुळे तात्काळ कुठलाही परिणाम होणार नाही हे औरंगजेब यांनी मान्य केलं.
पंतप्रधान मोदींची कठोर भूमिका
पाकिस्तान आणि दहशतवादाबद्दल भारताची कठोर भूमिका कायम आहे. सोमवारी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला संबोधन केलं. त्यावेळी ते म्हणाले की, “दहशतवाद आणि चर्चा एकत्र होऊ शकत नाही. दहशतवाद आणि व्यापारही एकत्र होऊ शकत नाही तसच पाणी आणि रक्त सुद्धा एकत्र वाहणार नाही” “पाकिस्तानी सैन्य, पाकिस्तान सरकार ज्या पद्धतीने दहशतवादाला प्रोत्साहन देतात, एक दिवस तेच पाकिस्तानला संपवतील. जर, त्यांना स्वत:ला वाचवायच असेल, तर त्यांना आपल्याकडचा दहशतवादाचा पाय संपवावाच लागेल” असं पीएम मोदी आपल्या संबोधनात म्हणाले.