क्रिकेट विश्वातून या क्षणाची मोठी बातमी समोर आली आहे. ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2023-2025 फायनलसाठी टीम जाहीर केली आहे. क्रिकेट बोर्डाने मुख्य संघात 15 खेळाडूंना स्थान दिलं आहें. तर ट्रॅव्हलिंग रिझर्व्ह म्हणून एका खेळाडूला संधी दिली आहे. पॅट कमिन्स या महाअंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाचं नेतृत्व करणार आहे. तर अनुभवी स्टीव्हन स्मिथ याच्याकडे उपकर्णधारपदाची धुरा आहे. आयसीसी आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने सोशल मीडियावरुन प्रसिद्धीपत्रकाद्वारे याबाबतची माहिती दिली आहे. ऑस्ट्रेलियासमोर या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचं आव्हान असणार आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका हा महाअंतिम सामना 11 ते 15 जून दरम्यान ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंड (Lords Cricket Ground) येथे खेळवण्यात येणार आहे. ऑस्ट्रेलियाची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये (World Test Championship Final) पोहचण्याची ही एकूण आणि सलग दुसरी वेळ ठरली आहे. तर दक्षिण आफ्रिकेची ही पहिलीच वेळ आहे. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला 2023 साली पराभूत करत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची गदा उंचावली होती. त्यानंतर आता ऑस्ट्रेलियाकडे सलग दुसऱ्यांदा ही कामगिरी करण्याची संधी आहे. मात्र त्यांच्यासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान आहे. दक्षिण आफ्रिका या सामन्यात कांगारुंविरुद्ध कशी कामगिरी करते? याकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष असणार आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या महाअंतिम सामन्यातून ऑलराउंडर कॅमरुन ग्रीन कमबॅक करणार आहे. ग्रीनला गेल्या काही महिन्यांपासून दुखापतीमुळे टीमपासून दूर रहावं लागलं होतं. मात्र आता ग्रीन परतल्याने ऑस्ट्रेलियाची ताकद वाढली आहे.
दरम्यान निवड समितीने सॅम कॉनस्टस यालाही संधी दिली आहे. सॅमने बॉर्डर गावसकर ट्रॉफी टेस्ट सीरिजमध्ये टीम इंडिया विरुद्ध आपली छाप सोडली होती. सॅमने टीम इंडिया विरुद्ध पदार्पण केलं होतं. सॅमने केलेल्या कामगिरीमुळे निवड समिताने त्याच्यावर विश्वास दाखवत पुन्हा एकदा संघात संधी दिली आहे.
डब्ल्यूटीसी फायनलसाठी ऑस्ट्रेलिया टीम
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलसाठी ऑस्ट्रेलिया टीम : पॅट कमिन्स (कर्णधार), स्कॉट बोलँड, एलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, सॅम कॉन्स्टास, मॅट कुह्नेमन, मार्नस लाबुशेन, नॅथन लायन, स्टीव्ह स्मिथ (उपकर्णधार), मिचेल स्टार्क आणि ब्यू वेबस्टर.
राखीव खेळाडू: ब्रेंडन डॉगेट.