नवी दिल्ली - पाकिस्तानरोधात राबविण्यात आलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशाची माहिती देशाच्या कानाकोपऱ्यात पोचविण्याच्या उद्देशाने भाजपकडून १३ ते २३ मे या कालावधीत तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
राष्ट्रीय एकता आणि तिरंगा ध्वजाचा सन्मान वाढविण्याचा दृष्टिकोन देखील या यात्रेमागे असल्याचे पक्ष सूत्रांकडून सोमवारी सांगण्यात आले. केंद्र आणि राज्यातील मंत्री, भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आमदार, खासदार, अन्य पदाधिकारी तसेच सर्व स्तरावरील कार्यकर्ते तिरंगा यात्रेत सहभागी होणार आहेत.
पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी सरकारने ‘ऑपरेशन सिंदूर’ ही मोहीम हाती घेतली होती. मोहिमेअंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधले नऊ दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले तर ११ हवाई तळांवर हल्ले चढवत पाकिस्तानच्या हवाई दलाला जबर दणका देण्यात आला होता.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रव्यापी अभियानाच्या स्वरूपात भाजपतर्फे तिरंगा यात्रा काढली जाणार आहे. काँग्रेसकडून दोन दिवसांपूर्वी दिल्लीसह अन्य काही ठिकाणी तिरंगा यात्रा काढण्यात आली होती, हे विशेष.
‘चुकीचे दावे खोडून काढा’
‘ऑपरेशन सिंदूर’च्या अनुषंगाने काही लोकांकडून चुकीची माहिती पसरवली जात आहे. ही माहिती यात्रेदरम्यान खोडून काढण्याचे निर्देश पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी अलीकडेच झालेल्या बैठकीत वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना दिल्याचे सूत्रांनी सांगितले. तिरंगा यात्रेच्या समन्वयाची जबाबदारी विनोद तावडे, संबित पात्रा, तरुण चुघ या वरिष्ठ नेत्यांकडे सोपविण्यात आली आहे.