Latest Marathi News Updates : राज ठाकरे आणि उदय सामंत यांची भेट, तासभर चर्चा
esakal May 13, 2025 05:45 PM
Punjab : अमृतसरमध्ये विषारी दारूने १४ जणांचा बळी, अनेकजणांची प्रकृती गंभीर

अमृतसरमध्ये विषारी दारू प्यायल्याने १४ जणांचा मृत्यू झालाय तर अनेक जण गंभीर आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. ११ मे रोजी दारू खरेदी केलेल्या आणि प्यायलेल्यांपैकी अनेकांचा सोमवारी सकाळीच मृत्यू झाला होता. आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू झाला आहे.

Mumbai : राज ठाकरे आणि उदय सामंत यांची भेट, तासभर चर्चा

शिवसेना शिंदे गटाचे नेते मंत्री उदय सामंत यांनी पुन्हा एकदा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. यामध्ये शिवसेना आणि मनसे यांच्यातील युतीसंदर्भात बोलणं झाल्याची चर्चा सुरू आहे.

Nashik Rain : नाशिकला अवकाळीने झोडपलं, पिकांचं प्रचंड नुकसान

नाशिक जिल्ह्याला अवकाळीने झोडपलं असून पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. कांदा, आंबा, डाळिंब, टोमॅटोसह पिकं मातीमोल झाली आहेत. नाशिक जिल्ह्याला येत्या दोन दिवसात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलाय.

Air India And Indigo: एअर इंडिया आणि इंडिगोने ७ शहरातील विमान उड्डाणे केली रद्द

भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी झाली असली तरी अद्याप तणाव पूर्ण निवळलेला नाही. सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर इंडिगो आणि एअर इंडियाने सात शहरातील विमान उड्डाणं रद्द केली आहेत. यात जम्मू, अमृतसर, चंदिगढ, लेह, जोधपूर, भूज, जामनगर, राजकोट यांचा समावेश आहे.

Marathwada : मराठवाड्यात अवकाळी पावसाचं थैमान, वीज पडून ६ जणांचा मृत्यू

मराठवाड्यात अवकाळी पावसानं थैमान घातलं असून गारपिटीचा फटका फळबागांना बसलाय. अवकाळी पावसात वीज पडून ६ जणांचा मृत्यू झाला असून १४ जनावरंही दगावली आहेत.

Mumbai Rain : राज्यात ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, मुंबईत पावसाला सुरुवात

राज्यात कोकणसह विदर्भातील काही भागात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलीय. मुंबईत आज सकाळपासून अनेक भागात पाऊस पडत आहे. राज्यातील ६ जिल्यांना यलो अलर्ट देण्यात आलाय.

Pune Rain : पुण्यात पुढील ४ दिवस पावसाचा यलो अलर्ट

पुणे शहरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने हजेरी लावलीय. उन्हाच्या कडाक्याने हैराण झालेल्या पुणेकरांना यामुळे दिलासा मिळालाय. दरम्यान, पुढचे चार दिवस पुणे शहराला यलो अलर्ट देण्यात आलाय.

Buldhana Accident : बुलढाण्यात भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू

बुलढाण्यातील भीषण अपघातामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला असून चार जण जखमी आहेत. जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. प्राथमिक माहितीनुसार, बुलढाण्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर हा अपघात घडला. पहाटे साडेचार वाजता नांदुरा शहराजवळ कार आणि ट्रकची जोरदार टक्कर झाली. यामध्ये कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला.

Belgaum Police : सोशल मीडियावरील वादग्रस्त १४ पोस्ट हटविल्या

बेळगाव : सोशल मीडियावरील वादग्रस्त १४ पोस्ट हटविण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी आज येथे माध्यम प्रतिनिधींशी बोलताना दिली. ते म्हणाले, ‘जिल्ह्यातील जलाशय, धरण तसेच संवेदनशील परिसरातील सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे.’

Satej Patil : आलमट्टी धरणप्रश्नी काँग्रेसचे रविवारी 'चक्का जाम' आंदोलन

कोल्हापूर : ‘कर्नाटक सरकारने आलमट्टी धरणाची उंची वाढविण्याचा घाट घातला आहे. याला विरोध करण्यासाठी सर्वप्रथम महाराष्ट्र सरकारला जाग आणणे गरजेचे आहे. यासाठी रविवारी (ता. १८) सकाळी १० वाजता जयसिंगपूरजवळील अंकली नाक्यावर ‘चक्का जाम’ आंदोलन करण्यात येणार आहे’, अशी घोषणा आज येथे काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनी केली.

CUET-UG परीक्षा आजपासून होणार सुरू, किती तारखेपर्यंत चालणार परीक्षा?

सीईयूटी यूजी आणि जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षा नियोजित वेळेनुसार होणार आहेत. भारत आणि पाकिस्तानमधील संघर्षानंतर या परीक्षांवर संकट आले होते. मात्र, आता दोन्ही देशांमधील युद्धबंदीच्या घोषणेनंतर, परीक्षा त्यांच्या नियोजित वेळेनुसार होतील. या परीक्षा १३ मे ते ०३ जून दरम्यान होणार आहेत.

Kolhapur News : कुत्र्याने चावा घेतल्याने ‘केअर टेकर’वर गुन्हा

कोल्हापूर : आर. के. नगर येथील शिवाजी उद्यानात सहा वर्षांच्या बालकाला कुत्रा चावल्यामुळे केअर टेकरवर गुन्हा दाखल झाला. श्रावण पडळकर (रा. पाचगाव, ता. करवीर) असे त्याचे नाव आहे. त्याच्याविरोधात राहुल रमेश खाडे यांनी फिर्यादी दिली आहे. त्यांचा मुलगा पृथ्वीराज याला रविवारी सायंकाळी कुत्रा चावल्याची फिर्याद त्यांनी करवीर पोलिस ठाण्यात दिली.

Gokul Dudh Sangh : 'गोकुळ'च्या गुरुवारच्या बैठकीत अध्यक्षांबाबत निर्णय शक्य

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची (गोकुळ) कार्यकारिणी बैठक १५ मे रोजी होत आहे. या बैठकीत अध्यक्ष बदल होणार की नाही, यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. यावेळी विद्यमान अध्यक्ष अरुण डोंगळे राजीनामा देणार की नाहीत, हे निश्चित होईल. अद्याप तरी अध्यक्षांच्या राजीनाम्याबाबात नेत्यांचा कोणताही निरोप नसल्याचे समजते. त्यामुळे या बैठकीत काय होणार, यावर पुढील अध्यक्ष ठरणार आहे.

Shiv Sena Thackeray Group : शिवसेना ठाकरे गटाची १७ ला मुंबईत बैठक

कोल्हापूर : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची १७ मे रोजी मुंबईत बैठक होत आहे. या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यातील आढावा घेतला जाणार आहे. यासाठी बूथ, गट, तालुका, जिल्हानिहाय निवडणूक तयारीची माहिती घेतली जाणार आहे. स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यावेळी मार्गदर्शन करणार आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होत आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या जिल्हानिहाय सभांचे नियोजन होणार आहे.

Indian Army : जालंधरला भारतीय सैन्य दलाने पाकचे दोन ड्रोन पाडले; जम्मूवर घिरट्या

चंदीगड : पंजाबमधील जालंधरमध्ये भारतीय सैन्य दलाने रात्री एक संशयित ‘ड्रोन’ निष्क्रिय केल्याची माहिती एका वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याने दिली. दरम्यान, सांबा, राजौरी, जम्मू, कथुआ अमृतसर, होशियारपूरसह वैष्णव देवीला जाणाऱ्या रस्त्यांवरही ब्लॅक आउट करण्यात आले.

10th Exam Result : दहावी परीक्षेचा निकाल आज दुपारी एक वाजता होणार जाहीर

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने यंदा फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज, मंगळवारी (ता. १३) दुपारी एक वाजता ऑनलाइन माध्यमातून जाहीर होणार आहे.

Donald Trump : अमेरिकेच्या हस्तक्षेपामुळे अणुसंघर्ष टळला; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा

Latest Marathi Live Updates 13 May 2025 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने यंदा फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज मंगळवारी (ता. १३) दुपारी एक वाजता ऑनलाइन माध्यमातून जाहीर होणार आहे. तसेच ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये भारतीय सैन्यदलांनी पाकिस्तानचे बरेच नुकसान केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांशी संवाद साधतानाच पाकिस्तानला दम दिला. ‘‘भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी शस्त्रसंधीचा निर्णय न घेतल्यास दोन्ही देशांसोबतचा व्यापार थांबविण्याचा इशारा मी दिला. अमेरिकेच्या हस्तक्षेपामुळे दोन्ही देशांमध्ये आण्विक संघर्षामध्ये रूपांतरित होऊ शकणाऱ्या परिस्थितीला टाळता आले आहे,’’ असा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची (गोकुळ) कार्यकारिणी बैठक १५ मे रोजी होत आहे. या बैठकीत अध्यक्ष बदल होणार की नाही, यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची १७ मे रोजी मुंबईत बैठक होत आहे. पाकिस्तानविरोधात राबविण्यात आलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशाची माहिती देशाच्या कानाकोपऱ्यात पोचविण्याच्या उद्देशाने भाजपकडून १३ ते २३ मे या कालावधीत तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर राज्यातील वातावरणात बदल पहायला मिळत आहे. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.