भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती. पाकिस्तानकडून दहशतवाद्यांना मिळत असलेल्या पाठिंब्यानंतर भारताने कठोर पावलं उचलली होती. पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानातील दहशतवादी ठिकाणं उद्ध्वस्त केली होती. यामुळे चवताळलेल्या पाकिस्तानने दहशतवाद्यांच्या दबाबामुळे भारतावर हल्ले करण्यास सुरुवात केली होती. भारताने प्रत्येक हल्ल्याचं चोख प्रत्युत्तर दिलं. तसेच पाकिस्तानला झुकण्यास भाग पाडलं. पाकिस्तानने भारताकडे दया याचना मागितली आणि सीजफायरची घोषणा करण्यात आली. दोन्ही बाजूने तणाव निवळल्यानंतर सर्व काही सुरळीत झालं आहे. या तणावपूर्ण स्थितीत आयपीएल आणि पीएसएल या दोन्ही स्पर्धा स्थगित करण्यात आल्या होत्या. बीसीसीआयने आयपीएल स्पर्धेतील उर्वरित सामने 17 मे पासून सुरु करण्याची घोषणा केली. असं असातना आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने पीएसएलच्या उर्वरित सामन्यांचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. ही स्पर्धा 17 मे पासून सुरु होणार आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे चेअरमन मोहसिन नकवीने मंगळवारी सोशल मीडियावर या बाबतची माहिती दिली आहे.
तणावपूर्ण स्थितीत पाकिस्तान सुपर लीग स्पर्धा स्थगित करण्यात आली होती. पीएसएल स्पर्धा शेवटच्या टप्प्यात होती. पाकिस्तान प्रीमियर लीगचे 34 पैकी 26 सामने खेळले गेले होते. फक्त 8 सामन्यांचा खेळ उरला होता. 8 मे रोजी पेशावर जाल्मी आणि कराची किंग्स यांच्यात सामना होणार होता. मात्र हा सामना रद्द करण्यात आला होता. मात्र आता 17 मे पासून ही स्पर्धा पुन्हा सुरु होणार आहे. तर 25 मे रोजी अंतिम सामना खेळला जाईल. आठ सामने शिल्लक असून यात एलिमिनेटर, क्वॉलिफायर आणि अंतिम सामन्याचा समावेश आहे. हे सामने रावलपिंडी आणि लाहोरमध्ये होणार आहे.
पाकिस्तान प्रीमियर लीग स्पर्धा स्थगितीनंतर दुबईत आयोजित करण्याचा विचार पीसीबीने केला होता. पण एमीरेट्स क्रिकेट बोर्डाने पीसीबीची ही मागणी फेटाळून लावली होती. यामुळे ही स्पर्धा स्थगित करण्याची वेळ आली होती. आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डापुढे विदेशी खेळाडूंना परत बोलवण्याचं आव्हान आहे. बोर्ड आणि फ्रेंचायझी यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र पाकिस्तानमधील स्थिती पाहता परत येतील असं वाटत नाही. दरम्यान, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने पुरुष संघासाठी नव्या प्रशिक्षकाची घोषणा केली आहे. माइक हेसन यांना पुरुष क्रिकेट संघाच्या व्हाइट बॉल प्रशिक्षकपदी नियुक्त केलं आहे. न्यूझीलंडचा अनुभवी कोच 26 मे पासून पाकिस्तान संघासोबत असणार आहे.