फुलवडे ता. १३, डिंभे (ता. आंबेगाव) येथील हुतात्मा बाबू गेनू जलाशयाचा पाणीसाठा मंगळवारी (ता. १३) सकाळी सहा वाजता ९.४९ टक्के इतका शिल्लक आहे. धरणातील पाणी कमी झाल्याने त्यातील मासे मरण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने मासे व जलजीवांचे संरक्षण होईल अशा उपाययोजना राबविणे गरजेचे आहे, अशी माहिती डिंभे मच्छिमार सोसायटीचे अध्यक्ष काशिनाथ वाघ यांनी दिली.
डिंभे धरणाची पाणी पातळी कमी झाली की, धरणातील अनेक माशांना आजार जडतात व त्यामुळे दरवर्षी मे महिन्यात मासे मरण्याचे प्रमाण वाढते. धरणात २०१९ पूर्वी फक्त इंडियन मेजर कार्प, रोहू, मृगल, कटला हे प्रमुख मासे तसेच पोपट, वाळज, कोळस, हामळी असे २३ प्रकारचे स्थिानिक मासे मिळत होते. डिंभे धरणात केज क्लचर आले. त्या सर्व केजेस मध्ये तिलापिया टाकली जात आहे. पावसाळ्यात वादळामुळे केजेस जाळी फाटल्यामुळे मोठ्या प्रमाणात धरणात तिलापिया गेल्याने ती इतर माशांचे बीज खात आहे. त्यामुळे स्थानिक प्रजाती नष्ट होताना दिसत आहे.
धरणात किमान पाणीसाठा शिल्लक ठेवा
डिंभे धरणात लहान माशांना मोठे तिलापिया मासे खातात. त्याचप्रमाणे गाळ आणि पाणी एकत्र होऊन पाणी गढूळ होते. त्यामुळे पाण्याची गुणवत्ता खूप खराब झाल्याने माशांच्या अंगावर चट्टे येतात. पाण्यातील ऑक्सिजन कमी होतो. त्यामुळे वाम, कोळस व इतर मासे मेलेले आढळतात. ते थांबविण्यासाठी धरणात किमान पाणीसाठा शिल्लक ठेवला तरच हे मासे जगतील. त्यांचे आजार कमी होतील. डिंभे धरणात मासेमारी करणारे ३१७ परिवार, भूमिहीन कातकरी, ठाकर व धरणग्रस्त महादेव कोळी समाज यांचा रोजगार चालेल असे वाघ यांनी सांगितले.
03949