तिकीट जनरलचे, प्रवास मात्र आरक्षित डब्यातून
esakal May 13, 2025 09:45 PM

पिंपरी, ता. १३ ः सध्या उन्हाळी सुट्ट्यांचा हंगाम सुरू असल्याने रेल्वेला प्रचंड गर्दी आहे. त्यामुळे रेल्वेच्या सर्व गाड्यांना वेटिंग असल्याने ऐनवेळी प्रवासाची तयारी करणाऱ्यांना आरक्षित तिकीट मिळत नाही. तिकीट न मिळाल्याने जनरल तिकीट काढून आरक्षण डब्यातून प्रवास करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. परिणामी, अगोदरच तिकीट आरक्षण करून प्रवास करणाऱ्यांना जनरल तिकीटधारक आणि फुकट्या प्रवाशांमुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
पिंपरी स्थानकात केवळ सिंहगड एक्स्प्रेस आणि चिंचवड स्थानकावर सिंहगडसह इतर चार एक्स्प्रेस गाड्यांना थांबा देण्यात आला आहे. मात्र, लांब पल्याच्या एक्स्प्रेस गाड्यांना पिंपरी आणि चिंचवड स्थानकावर थांबा नसल्यामुळे रेल्वे पकडण्यासाठी पुणे स्थानकावर जावे लागते. पुणे रेल्वे स्थानकावर दिवसाला १५० हून अधिक रेल्वे गाड्यांची दररोज ये-जा असते. या गाड्यांमधून हजारोंच्या संख्येने प्रवासी प्रवास करतात. सध्या उन्हाळी सुट्टीचा हंगाम सुरू असल्याने रेल्वेला तुफान गर्दी आहे. आरामदायी प्रवास व्हावा, यासाठी अनेकजण आरक्षित तिकीट काढतात. मात्र, आरक्षित तिकीट मिळूनही अनेक प्रवाशांचा प्रवास त्रासदायक होत आहे. आरक्षित तिकीट नसलेले प्रवासी, प्रतीक्षा यादीतील प्रवासी रेल्वेगाड्यांमध्ये शिरत असून, रेल्वे डब्यात जिथे जागा मिळेल, तिथे हे प्रवासी बसतात. बऱ्याच वेळा दादागिरी करताना दिसून येतात. त्यामुळे आरक्षण करून प्रवास करणाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये तर याचे प्रमाण जास्त आहे. अशा प्रवाशांवर रेल्वे प्रशासनाकडून कारवाई होत असली तरी अजूनही असे प्रकार सर्रास पाहायला मिळत आहेत.

काय आहेत अडचणी ?
- सध्या उन्हाळी सुट्टीमुळे सर्वच रेल्वेला गर्दी
- बहुतांश सर्वच रेल्वेच्या तिकिटासाठी वेटिंग
- अनेक रेल्वे गाड्यांना जनरल डब्यांची संख्या कमी
- जनरल डब्यांची संख्या कमी असल्याने प्रवाशांना दाटीवाटीने प्रवास करावा लागतो
- जनरल डब्यात गर्दी असल्याने काही प्रवासी आरक्षण डब्यातून प्रवास करतात

रेल्वे प्रशासनाकडून वेळोवेळी तिकीट तपासणीची विशेष मोहीम राबवून अशा प्रवाशांवर दंडात्मक कारवाई केली जाते. प्रत्येक रेल्वेमध्ये तिकीट तपासणी करण्यासाठी तिकीट तपासणीस (टीसी) असतात. प्रवाशांनी त्यांच्याकडे किंवा आरपीएफ व रेल्वेच्या हेल्पलाइन क्रमांकावर तक्रार करावी.
- हेमंतकुमार बेहरा, जनसंपर्क अधिकारी, पुणे विभाग

मुंबईवरून तिकीट आरक्षण करून पुण्याला येत होतो. पण, आमच्या आरक्षण डब्यात बरेच प्रवासी जनरल तिकीट काढून प्रवास करत होते. एकाने त्या प्रवाशांना हटकल्यास तो दादागिरी करायला लागला. या प्रवाशांमुळे आरक्षण करून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना डोकेदुखी होत आहेत.
- अनिकेत माने, प्रवासी

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.