जुन्नर, ता.१३ : जुन्नर शहरात सोमवारी (ता.१२) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास तासभर अवकाळी पाऊस कोसळला. पावसाने शहरातील अनेक रस्त्यांवरून पावसाचे पाणी वाहत होते. रस्त्यावरील खाच खळग्यात तसेच खड्डयांत पाणी साचले होते. यामुळे वाहनचालकांना रस्त्यावरून वाहने चालवितांना कसरत करावी लागत होती.
नगर पालिकेने वर्षांपूर्वी कल्याण पेठेतील नाल्यावरील पुलाचे काम केले. मात्र दोन्ही बाजूच्या रस्त्याचे काम न केल्याने दोन्हीकडे पावसाचे पाणी साचून राहात आहे. रविवार पेठेतील गणेश मंदिराजवळ देखील पाणी साचते. रस्त्यावरील खड्डे पावसाळ्यापूर्वी बुजविण्याची आवश्यकता असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. बंदिस्त गटारातून पाणी वाहून जाण्यासाठी कोणतीही व्यवस्था नसल्याने दरवर्षी पावसाळ्यात बहुतेक रस्त्यांना नद्यांचे स्वरूप येते. पावसाच्या पाण्यामुळे रस्त्याची दुरवस्था होत आहे. याकडे पालिका प्रशासनाने वेळीच लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे
08513