17 जणांचा बळी घेणाऱ्या होर्डिंग दुर्घटनेला वर्ष, 'पेट्रोल पंपावर गेलो तर अजूनही आठवतो तो दिवस'
BBC Marathi May 14, 2025 02:45 AM
BBC घाटकोपर होर्डिंग दुर्घटना

"मी त्या दिवशी थोडक्यात वाचलो. पण तो दिवस कधीही विसरता येणार नाही. आजही कोणत्याही पेट्रोल पंपवर पेट्रोल भरण्यासाठी गेलो की आधी वरती नजर जाते. आणि तो दिवस आठवतो. विचार येतो की हे होर्डिंग तर पडणार तर नाही ना," असं एजाज अन्सारी यांनी सांगितलं.

13 मे 2024 रोजी मुंबईतील घाटकोपरमध्ये महाकाय असं होर्डिंग कोसळलं आणि यात 17 जणांचा मृत्यू तर जवळपास 75 जण जखमी झाले होते.

जवळपास 100 लोक या होर्डिंगखाली अडकले होते. या घटनेला आज (13 मे 2025) एक वर्ष पूर्ण झालं. पण आजही ही घटना पाहिलेले साक्षीदार आणि पीडित हा दिवस विसरू शकलेले नाहीत.

'डोळ्यादेखत ही घटना आपण पाहिली,' असं एजाज अन्सारी सांगतात.

आता या घटनेला एक वर्षं पूर्ण होत असताना गेल्या वर्षभरात काय घडलं? यात किती जणांवर कारवाई झाली? होर्डिंग पॉलीसी बनली का? असे अनेक प्रश्न आहेत. याचाच आढावा घेण्याचा प्रयत्न करूया.

'आजही तो दिवस जसाच्या तसा आठवतो'

भिवंडीचे रहिवासी असलेले 48 वर्षीय एजाज अन्सारी गेल्या वर्षी याच दिवशी म्हणजे 13 मे रोजी काही कामानिमित्त बाईकवरून मुंबईत आले होते. यावेळी परतीच्या प्रवासात असताना पेट्रोल भरण्यासाठी ते घाटकोपरच्या पेट्रोल पंपवर पोहचले. पण त्यावेळी धो-धो पाऊस पडत होता.

पेट्रोल पंपजवळ जाताच पावसात आसरा घेण्यासाठी ते बाईक बाजूला घेत उभे राहिले आणि त्यांच्या डोळ्यादेखत होर्डिंग कोसळलं.

"माझ्यासमोर एक डांबराचा टँकर होता. मी या टँकरमागे असल्याने थोडक्यात बचावलो. माझ्या बाईकचं थोडं नुकसान झालं पण मी नशिबाने वाचलो. अनेक जण सैरावैरा वळू लागले. अनेक जण आतमध्ये अडकले. नंतर अनेकांचा मृत्यू झाला. ही अत्यंत दु:खद घटना होती. आजही ही घटना जशीच्या तशी आठवते. पेट्रोल पंपवर गेलो तर भीती वाटते. टँकर नसता तर कदाचित मी सुद्धा वाचलो नसतो," असं एजाज म्हणाले.

Bhavesh Bhinde Guju/facebook या प्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी भावेश भिंडे

एजाज यांच्याप्रमाणे अनेक जण त्याठिकाणी होते. त्यादिवशी मुंबईत संध्याकाळच्या वेळी अचानक पाऊस पडायला सुरुवात झाली होती. यामुळे केवळ इंधन भरण्यासाठी आलेले वाहन चालकच नव्हे तर इतरही अनेक जण पावसात आसरा घेण्यासाठी पेट्रोल पंपजवळ पोहचले होते. वारा सुरू होता आणि यातच अचानक पेट्रोल पंपजवळ असलेलं एक भलंमोठं होर्डिंग कोसळलं आणि यात जवळपास 100 लोक अडकले.

लोकांना बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू झालं. जखमींना बाहेर काढल्यानंतरही अवशेष काढण्यासाठी जवळपास तीन दिवस हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू होतं. या दुर्घटनेत 17 जणांचा मृत्यू झाला.

होर्डिंगबाबतचे सुधारणा धोरण अद्याप का नाही?

घाटकोपरमध्ये 13 मे रोजी होर्डिंग कोसळण्याच्या घटनेनंतर मुंबई महानगरपालिकेकडून नवीन होर्डिंग धोरण तयार केलं जात असून यासाठीचा मसुदा तयार करण्यात आला आहे.

परंतु या घटनेला वर्ष पूर्ण होत असतानाही अद्याप हे धोरण अंतिम करण्यात आलेलं नाही याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

यासंदर्भात मुंबई महानगरपालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर माहिती दिली.

ANI घाटकोपरमध्ये 13 मे रोजी होर्डिंग कोसळण्याच्या घटनेनंतर मुंबई महानगरपालिकेकडून नवीन होर्डिंग धोरण तयार केलं जात असून यासाठीचा मसुदा तयार करण्यात आला आहे.

बीएमसीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून सांगण्यात आलं की, "आपला मसुदा तयार आहे. यासंदर्भात सुनावणी सुद्धा पार पडली. मसुद्यावर जवळपास 450 हून अधिक हरकती आणि सूचना सुचवल्या गेल्या होत्या. यासंदर्भात वरिष्ठांशी चर्चा होईल. यानंतर धोरण अंतिम केलं जाईल. भोसले कमिटीच्या रिपोर्टसाठी आपण थांबलो होतो. हा रिपोर्ट सरकारकडे नुकताच सबमीट करण्यात आला. परंतु अद्याप माझ्या डिपार्टमेंटपर्यंत आलेला नाही. या रिपोर्टसाठी आम्ही थांबलो होतो यामुळे धोरण अंतिम व्हायचं राहिलं आहे," असंही त्यांनी सांगितलं.

मुंबईतील आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगले यांनी मुंबई महानगरपालिकेने नवीन जाहिरात धोरणाच्या मसुद्यावर पार पडलेल्या सुनावणीत काही सूचना उपस्थित केल्या होत्या.

यासंदर्भात बोलताना ते म्हणाले, "मुंबई महानगरपालिकेतर्फे नवीन जाहिरात धोरण बनविण्यासाठी भायखळा येथील जिजामाता उद्यानात आयोजित सुनावणीत मी काही सूचना दिल्या होत्या. ज्यात 24 वॉर्डात बॅनरसाठी राखीव स्थळ बनविण्याची प्रमुख सूचना होती. मुंबईतील पदपथ जाहिरात फलक मुक्त करावेत. यात पालिका, एमएमआरडीए, एमएसआरडीसी, बीपीटी आणि रेल्वे संबंधातील जाहिरात फलकाचा समावेश आहे. महाराष्ट्र आग आणि सुरक्षा अधिनियम 2006 अंतर्गत प्रत्येक सहा महिन्यात जाहिरात फलकाचे सुरक्षा ऑडिट करावे.

"मुंबईतील 24 वॉर्ड कार्यालयाच्या अंतर्गत राजकीय, सामाजिक आणि धार्मिक जाहिरात करण्यासाठी काही समर्पित स्थळ निश्चित केल्यास पालिकेला महसूल प्राप्त होईल. यामुळे अनधिकृत जाहिरात फलक लावण्याची प्रकरणं कमी होतील. तसेच लेझर जाहिराती आणि निर्माणधीन इमारतीत जाहिरात बाबत परवानगी दिल्यास शासकीय महसूलीत वाढ होईल, अशा सूचना मी केल्या होत्या," असं गलगली सांगतात.

परंतु वर्ष पूर्ण होत असतानाही हे धोरण अद्याप निश्चित नाही असंही ते म्हणाले.

FACEBOOK मुंबईतील आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगले यांनी मुंबई महानगरपालिकेने नवीन जाहिरात धोरणाच्या मसुद्यावर पार पडलेल्या सुनावणीत काही सूचना उपस्थित केल्या होत्या.

तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या घाटकोपरच्या माजी नगरसेविका आणि मुंबईच्या अध्यक्ष राखी जाधव यांनीही यावर टीका केली. वर्षभरात होर्डिंगबाबतचं धोरण यायला हवं होतं असं त्या म्हणाल्या.

राखी जाधव यांनी सांगितलं, "एखादा अपघात जेव्हा शहरात घडतो त्यावेळी प्रशासन किंवा राज्यकर्ते सतर्क होतात. त्यावर कार्यवाही होणं, वक्तव्य, दुरुस्ती करू असं बोललं जातं. होर्डिंगचा विषय आला की रेव्हेन्यूबाबत बोललं जातं पण तरीही मुंबईकरांचा जीवाला किंमत नाहीय का? बेजबाबदार लोकांवर शासन होत नाही. वर्षभरात होर्डिंग पॉलिसी यायला हवी होती. अंतिम पॉलिसीत काय राहणार यावरही स्पष्टता नाही."

तर 8 मार्च रोजी पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले, की "राज्यातील आणि मुंबईतील एक लाख नऊ हजार 387 धोकादायक होर्डिंग आतापर्यंत काढून टाकण्यात आली असून, राज्याच्या होर्डिंग धोरणामध्ये सुधारणा करण्यात येणार आहे."

तसंच होर्डिंग पडून होणाऱ्या दुर्दैवी घटना टाळण्यासाठी अधिकृत आणि अनधिकृत सर्व होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट सर्व महानगरपालिका आणि नगरपालिकांकडून करण्यात येणार असल्याची माहिती दिल्याचं राज्याच्या माहिती आणि जनसंपर्क कार्यालयाने दिली होती.

चौकशी अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर

घाटकोपर दुर्घटनेनंतर राज्य सरकारने निवृत्त न्यायाधीश दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन केली होती. या समितीने आपला अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला आहे.

निवृत्त न्यायाधीश दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली होती. 7 मे 2025 रोजी हा चौकशी अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्यात आला आहे. हा अहवाल सिलबंद असून तो गृह विभागाकडे सोपवण्यात आल्याची माहिती देण्यात आली. तसंच चौकशीसोबतच या अहवालात काही उपाययोजना सरकारला सुचवण्यात आल्या आहेत.

BBC घाटकोपर दुर्घटनेनंतर राज्य सरकारने नीवृत्त न्यायाधीश दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन केली होती.

माजी खासदार आणि भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी सांगितलं, "आम्ही हा विषय लॉजिकल एंडपर्यंत नेला आहे. या घटनेनंतर होर्डिंग कंपनीतील संबंधितांना अटक झाली. सदोष मनुष्यवधाचा गुन्हा असल्यामुळे अनेक महिने आरोपींना जामिन देखील मिळाला नव्हता. सर्वांना अटक झाली होती. भिंडेने अधिकारी कैसर खलीद आणि पत्नीच्या कंपनीत पैसे दिले होते त्याची चौकशी अँटी करप्शनच्या माध्यमातून सुरू आहे. कैसर खलीद यांचं निलंबन अजून दूर झालेलं नाही. जस्टीस भोसले कमिटीचा अहवाल सुद्धा आला आहे. तसंच 40 बाय 40 चं होर्डिंग असलं पाहिजे हे स्वीकारलं गेलं. कोर्टानेही त्याला मान्यता दिली आहे."

BBC नि. न्या. दिलीप भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अहवाल सुपूर्त केला.

तसंच "या प्रकरणी बीएमसीच्याही संबंधित अधिकाऱ्यांवरही कारवाई व्हायला हवी अशी आमची अपेक्षा आहे," असंही सोमय्या म्हणाले.

'त्या' दिवशी नेमकं काय घडलं होतं?

13 मे 2024 ला संध्याकाळी साडे चार वाजताच्या सुमारास मुंबईतलं तापमान अचानक घटलं आणि वादळी वाऱ्यासह पावसाला सुरूवात झाली. अगदी घडाळ्याच्या काट्यावर चालणाऱ्या मुंबईकरांचं वेळापत्रक अचानक हवामान बदलामुळे पूर्ण कोलमडलं. एकाबाजूला मध्य रेल्वे, हार्बर रेल्वे उशिराने धावत होत्या तर मुंबईतील वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे आणि ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर वाहतूक कोंडी झाली होती.

या दरम्यानच ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेलगत पेट्रोल पंपाच्या छताखाली पावसापासून वाचण्यासाठी अनेकांनी आसरा घेतला, तर हायवेवरील पेट्रोल पंप असल्याने पेट्रोल आणि सीएनजीसाठी चारचाकी, दुचाकी, ट्रक यांच्याही रांगा तिथं लागल्या होत्या. अशा परिस्थितीत पाच वाजताच्या सुमारास अचानक पेट्रोल पंपाच्या बाजूला असलेलं होर्डिंग खाली कोसळलं आणि मोठी दुर्घटना झाली. पेट्रोल पंपाच्या छताजवळ उभे असलेले काही लोक तत्काळ सैरावैरा धावू लागले.

पोलीस, अँब्युलन्स, अग्नीशमन दल आणि नंतर एनडीआरएफला बोलवण्यात आलं आणि पुढच्या काही मिनिटांत ही दुर्घटना काही छोटी नाही हे सुद्धा स्पष्ट झालं.

ANI 13 मे रोजी संध्याकाळी साडे चार वाजताच्या सुमारास मुंबईतलं तापमान अचानक घटलं आणि वादळी वाऱ्यासह पावसाला सुरूवात झाली.

एकामागोमाग लोकांना स्ट्रेचरवर उचलून ठेवून जवळच्या रुग्णालयात पाठवण्यात येत होतं. किरकोळ जखमी झालेले लोक काही तासांत उपचार घेवून बाहेर पडले, परंतु मोठ्या संख्येने लोकांना गंभीर दुखापत झाली. अनेकांना टाके बसले, हात, पाय फ्रॅक्चर झाले, काहींना न्यूरोसर्जरीची आवश्यकता भासली तर तब्बल 17 जणांचा यात मृत्यू झाल्याचंही स्पष्ट झालं.

होर्डिंगचा स्टँडी पूर्णतः लोखंडाचा असल्याने ढिगारा बाहेर काढायलाही यंत्रणांना वेळ लागत होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि काही मंत्र्यांनी घटनास्थळाची पाहणी केली होती. घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले. तसंच मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली.

जवळपास तीन दिवसांनी 16 मे रोजी दुपारी महानगरपालिकेने रेस्क्यू आॅपरेशन संपल्याचं जाहीर केलं.

संबंधित होर्डिंग हे 'इगो मीडिया' कंपनीचे होते. या दुर्घटनेनंतर या प्रकरणातील 'इगो मीडिया' कंपनीचे मालक भावेश भिंडेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मुंबई क्राईम ब्रांचने त्याला राजस्थान येथून अटक केली होती.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.