जालंधर : ‘‘दहशतवादाविरोधात आम्ही लक्ष्मण रेषा आखली असून आता पुन्हा हल्ला झाल्यास सडेतोड प्रत्युत्तर देऊ. ऑपरेशन सिंदूर ही आमच्यासाठी सामान्य बाब आहे. पाकिस्तानमध्ये कोठेही दहशतवादी शांततेत राहू शकणार नाही, घरामध्ये घुसून त्यांना ठेचले जाईल,’’ अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुन्हा पाकिस्तानचे वाभाडे काढले. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर थेट पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांचा नायनाट करणाऱ्या भारतीय हवाई दलाच्या पाठीवर खुद्द पंतप्रधानांनी शाबासकीची थाप दिली आहे. आदमपूर येथील हवाई तळास भेट देत मोदी यांनी जवानांशी संवाद साधला.
मोदी म्हणाले, ‘‘भारत माता की जय हा केवळ आमच्यासाठी नारा नाही तर राष्ट्रासाठी स्वतःचे बलिदान देण्याचा संकल्प आहे. आमच्या माता भगिनींचे कुंकू हिरावून घेण्यात आल्यानंतर आम्ही दहशतवाद्यांच्या घरामध्ये घुसून त्यांना ठेचण्याचे काम केले. पळपुटे पाकिस्तानी हे देशात लपून-छपून घुसखोरी करतात पण त्यांनी ‘हिंद’च्या लष्कराला आव्हान दिले होते हे ते विसरले. आमच्या लष्कराने दहशतवाद्यांची सारी तळे नष्ट केली. जवळपास नऊ तळे नष्ट करण्यात आली तसेच शंभरहून अधिक दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले. देशाकडे नजर वर करून पाहणाऱ्या दहशतवाद्यांच्या म्होरक्यांना आगळीक कराल तर त्याचे परिणाम भोगावे लागतील हा असा सूचक इशारा देण्यात आला. दहशतवादाविरोधातील भारताची लक्ष्मण रेषा स्पष्ट आहे. आता कोणताही हल्ला झाला तरीसुद्धा भारत त्याला तसेच प्रत्युत्तर देईल. ऑपरेशन सिंदूर हे आमच्यासाठी न्यू नॉर्मल आहे.’’
‘‘हवाई दलाच्या पराक्रमाचे पडसाद जगभर ऐकू येऊ लागले आहेत. प्रत्यक्ष मोहिमेच्या काळात भारतीय नागरिक तुमच्यासोबत खंबीरपणे उभा राहिला. देशातील प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये जवानांच्या कुटुंबीयांबाबत एक कृतज्ञतेची भावना आहे. ऑपरेशन सिंदूर ही काही सामान्य गोष्ट नाही. भारताची नीती, नियत आणि निर्णायक क्षमता यांचा हा त्रिवेणी संगम आहे,’’ असे पंतप्रधान मोदींनी नमूद केले.
शस्त्रसंपदेचे कौतुकपंतप्रधान मोदी यांनी ‘मेड इन इंडिया’ शस्त्रांचे देखील तोंडभरून कौतुक केले. ‘कौशल दिखलाया चालों में, उड गया भयानक भालों में, निर्भीक गया वह ढालों में, सरपट दौडा करवालों में,’ या महाराणा प्रताप यांच्या चेतक घोड्याला लागू असणाऱ्या काव्यपंक्ती अत्याधुनिक भारतीय शस्त्रांना देखील चपखल लागू होतात,’ असे मोदी यांनी सांगितले.
मोदी म्हणालेभारताच्या हल्ल्याने पाकिस्तान जखमी
पुन्हा हल्ला केल्यास सडेतोड प्रत्युत्तर
पाकच्या विनवणीनंतर भारतीय जवान थांबले
पाकचे हल्ले हवाई दलाने निष्प्रभ ठरविले
हवाई दलाकडे डेटा अन् ड्रोनचे शस्त्र
पाकिस्तानचा खरा चेहरा उघड केला