Maharashtra Live Update : भूषण गवई आज घेणार सरन्यायाधीशपदाची शपथ
Sarkarnama May 14, 2025 02:45 PM
भूषण गवई घेणार सरन्यायाधीशपदाची शपथ

भारताचे 51 वे सरन्यायाधीश म्हणून महाराष्ट्राचे सुपुत्र भूषण गवई आज शपथ घेणार आहे. राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू या गवई यांना शपथ देतील. या शपथविधीसाठी भूषण गवई यांच्या आई आणि परिवार उपस्थित राहणार आहे.

Nashik : युद्धाच्या काळात पाकिस्तानमधील वेबसाईटवर सर्च करणाऱ्याला अटक

भारत-पाकिस्तानमधील युद्धाच्या काळात पाकिस्तानच्या वेबसाईट सर्च केल्याच्या संशयावरून दहशतवादी विरोधी पथकाने नाशिकच्या मालेगावमधील एका 45 वर्षीय व्यक्तीला ताब्यात घेतलं. या व्यक्तीची जवळपास सहा तासांहून अधिक वेळ चौकशी करण्यात आल्याची माहिती आहे.

आंतरजातीय विवाह करणाऱ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांच्या सुरक्षेसाठी राज्य सरकारने मोठं पाऊलं उचललं आहे. राज्य सरकारने आता आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांच्या सुरक्षेची जबाबदारी स्वतः पोलिस आयुक्तांकडे सोपवली आहे. त्यामुळे असे विवाह करणाऱ्या जोडप्यांचे अनुदान बंद केल्याच्या चर्चा सुरू असतानाच त्यांच्या सुरक्षेबाबत सरकारने महत्वाचा निर्णय घेतल्याचं पाहायला मिळत आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर राज्य सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे.

Jammu Kashmir : काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मंजूर नाही - परराष्ट्र मंत्रालय

काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मंजूर नाही, असं म्हणत भारताचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी पाकिस्तानसह अमेरिकेला सुनावलं आहे. जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाशी संबंधित कोणतेही प्रश्न भारत आणि पाकिस्तानने द्विपक्षीय पद्धतीने सोडवले अशी आमची दीर्घकाळापासूनची राष्ट्रीय भूमिका असल्याचही परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केलं. त्यामुळे या धोरणात आताही कोणताही बदल झालेला नसून उलट पाकिस्तानने बेकायदेशीरपणे व्यापलेल्या भारतीय भूभाग रिकामी करावा हा प्रलंबित मुद्दा आहे, असंही जयस्वाल यांनी म्हटलं आहे.

Operation Sindoor : मोदींच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक

जगभरात गाजलेल्या भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीपूर्वी सीसीएसची बैठक होणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे आजच्या या बैठकीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.