IPL 2025: मॅक्सवेलशी लग्न केलं नाहीस म्हणून तो चांगला खेळत नाही! फॅनच्या अजब लॉजिकवर प्रीती झिंटा संतापली
esakal May 14, 2025 04:45 PM

इंडियन प्रीमियर लीग (IPL) म्हटलं की खेळाडू आणि संघांसोबतच चर्चेत असतात ते संघमालक. बऱ्याच संघांचे संघमालक त्यांच्या संघांना पाठिंबा देण्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थित असतात. त्यामुळे त्यांचे हावभाव, त्यांच्या रिऍक्शन्स हे चर्चेचे विषय ठरतात.

अशीच एक संघमालकीण म्हणजे अभिनेत्री . ती पंजाब किंग्स संघाची संघमालकिण आहे. ती नेहमीच पंजाबच्या संघाला पाठिंबा देण्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थित असते. ती सामन्यानंतर खेळाडूंना भेटून त्यांना प्रोत्साहन देतानाही दिसते. तसेच ती सोशल मीडियावरही सक्रिय असते.

पण, नुकताच एक्स (आधीचे ट्वीटर) या प्लॅटफॉर्मवर तिला अनोखा प्रश्न एका युझरकडून विचारण्यात आला. त्यावर तिने तिखट प्रतिक्रिया दिली आहे. युझरने तिला विचारले की 'मॅम मॅक्सवेलचे लग्न तुमच्याशी झाले नाही, म्हणून तो तुमच्या संघाकडून चांगलं खेळत नाहीये ना?' पण त्या युझरने प्रीती झिंटाकडून आलेल्या उत्तरानंतर आपले ट्वीट डिलिट केले आहे.

आणि पंजाब संघाचं अनोखं नातं आत्तापर्यंत पाहायला मिळालं आहे. मॅक्सवेल २०१४ मध्ये पहिल्यांदा या संघाकडून खेळला. त्यानंतर २०१४ ते २०१७ दरम्यान या संघाकडून खेळला. त्यानंतर त्याला या संघाने दूर केलं, पण परत २०२० च्या हंगामातही तो पंजाबचा भाग होता.

पुन्हा तो या संघातून बाहेर झाला. पण २०२५ साठी पुन्हा पंजाबने ४.२ कोटी रुपये मोजत त्याला संघात घेतले. पण मॅक्सवेलला आयपीएल २०२५ मध्ये ७ सामन्यांत ४८ धावाच करता आल्या आणि ४ विकेट्सच घेतल्या. त्यातच तो दुखापतग्रस्त झाल्याने उर्वरित आयपीएल २०२५ मधूनही बाहेर झाला आहे.

दरम्यान, प्रीती झिंटाने युझरने विचारलेल्या लग्नासंबंधीच्या प्रश्नावर उत्तर दिले की 'तुम्ही असा प्रश्न सर्व संघांच्या पुरुष संघमालकांना विचाराल का की हा भेदभाव फक्त महिलांशीच आहे? मी क्रिकेटमध्ये येईपर्यंत मला माहितीही नव्हते की महिलांसाठी कॉर्पोरेट सेटअपमध्ये टिकून राहणे किती कठीण आहे. मला विश्वास आहे की तुम्ही हा प्रश्न गमतीनेच विचारला असेल.'

'पण मला आशा आहे की तुमच्या प्रश्नाकडे तुम्ही जरा पाहाल आणि तुम्ही काय बोलण्याचा प्रयत्न करताय, हे समजून घ्या. जर तुम्हाला ते खरंच समजलं, तर तुमच्या लक्षात येईल, की ते योग्य नाही. मला वाटतं मी १८ वर्षांपासून मेहनत करून माझं पद मिळवलं आहे. प्लीज मला तो पात्र असलेला आदर द्या आणि हा लिंगभेद थांबवा. धन्यवाद.'

पंजाब किंग्सने यंदाच्या हंगामात श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात चांगली कामगिरी केली आहे. पंजाबने आत्तापर्यंत ११ सामने आयपीएल २०२५ मधील सामने खेळले असून ७ सामने जिंकले आहेत आणि तीन सामने पराभूत झाले आहेत. तसेच एक सामना पावसामुळे रद्द झाला आहे. त्यामुळे त्यांचे १५ गुण असून पंजाब तिसऱ्या क्रमांकावर आहे. पंजाबनेही जवळपास प्लेऑफमधील स्थान पक्के केले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.