आधी माफी, मगच राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणाची चर्चा; मिटकरींनी सांगितला अटी-शर्थीचा फॉर्म्युला
Marathi May 14, 2025 06:25 PM

मुंबई : राज्यात शिवसेना ठाकरे आणि मनसे एकत्र येण्याची चर्चा जोर धरत असतानाच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसही (NCP) एकत्र येण्याची चर्चा रंगत आहे. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून तशी मागणीही उघडपणे केली जात आहे. विशेष म्हणजे पुण्यात खासदार सुप्रिया सुळे यांना विनंती करणारा बॅनरही एका पदाधिकाऱ्याने झळवला होता. त्यामुळे, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि अजित पवारांचा पक्ष एकत्र येईल का, यावरील चर्चा अद्यापही जोर धरत आहेत. त्यातच, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाचे प्रवक्ते आणि आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा कुठलाही विषय आमच्या बैठकीत नव्हता. तसेच, दोन पक्ष एकत्र येण्याच्या बातम्या पेरण्यात आल्या असून त्यात तथ्य नसल्याचं त्यांनी म्हटलं. मात्र, जर दोन राष्ट्रवादी एकत्र येत असतील तर आमच्या पक्षाच्या काही अटी-शर्थी आहेत, असे म्हणत त्यांनी एकत्र येण्याचा फॉर्म्युलाच एकप्रकारे सांगितला आहे.

आपल्या पक्षातील गळती रोखण्यासाठी शरद पवारांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणाबद्दल वक्तव्य केल्याचं अजित पवार यांनी म्हटलं. मुंबईतील पक्षाच्या बैठकीत अजित पवारांनी हे वक्तव्य केल्याचं  बोललं जातंय. मात्र, पक्षाच्या बैठकीत अजितदादांनी असं कोणतंही वक्तव्य केलं नसल्याची स्पष्टोक्ती राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी दिलीय. या संदर्भात सूत्रांच्या हवाल्याने दाखविल्या जात असलेल्या बातम्या धादांत खोट्या असल्याचं मिटकरी यांनी म्हटलं आहे. राज्याचे क्रीडामंत्री दत्ता भरणे यांच्या शासकीय निवासस्थानी झालेल्या या बैठकीला आमदार अमोल मिटकरीही मुंबई येथे उपस्थित होते. दरम्यान, पक्षाच्या बैठकीतल्या गोष्टी बाहेर जात असतील तर असं करणाऱ्यांवर पक्षाने कठोर कारवाई करावी. पक्षातील बैठकीत न झालेल्या चर्चांच्या खोट्या बातम्या बाहेर पेरणाऱ्या सूत्रांवर पक्षाने कारवाई करण्याची मागणी आपण अजित पवार यांच्याकडे करणार असल्याचेही आमदार मिटकरी यांनी सांगितले.

दरम्यान, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येताना आमच्या पक्षाच्या काही अटी-शर्थी असणार असल्याचं आमदार मिटकरी यांनी म्हटलं आहे. अजित दादांवर पातळी सोडून टीका करणाऱ्यांनी सर्वात आधी त्यांची माफी मागावी, त्यानंतरच एकीकरणावर चर्चा होणार. त्यासोबतच दोन्ही पक्ष एकत्र हे अजित पवारांच्या नेतृत्वातच एकत्र यावेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. शरद पवार हे देशाचे, राज्याचे आणि पक्षाचे कायम मार्गदर्शक आहेत, असंही मिटकरी यांनी यावेळी म्हटलं. म्हणजे, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासाठीची फॉर्म्युलाच त्यांनी सांगितलाय.

काय म्हणाले होते शरद पवार

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येण्याबाबतचा निर्णय सुप्रिया सुळे यांनी घ्यावा, असेही शरद पवारांनी सूचवले होते. त्यानंतर, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रिकरणावर सध्या चर्चेत आहे. विशेष म्हणजे खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील याबाबत प्रतिक्रिया दिली होती. त्यानुसार, आधी देश महत्त्वाचा आहे, सध्या देशातील युद्धजन्य परिस्थिती पाहाता यास प्राधान्य आहे, त्यानंतर एकत्रिकरणाचं पाहू, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटलं होतं.

मविआत शरद पवारांच्या भेटीगाठी वाढल्या

शिवसेना ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर हे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भेटीला पोहोचले आहेत. आमदार सचिन अहिर हे पवारांच्या गाडीत बसून सिल्वर ओकच्या दिशेने निघाले. विशेष म्हणजे सचिन अहिर यांच्या आधी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देखील शरद पवारांची भेट घेतली. एकीकडे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू असताना महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या शरद पवार यांच्यासोबतच्या भेटीने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

हेही वाचा

आनंदाची बातमी! सोन्याच्या दरात मोठी घसरण, प्रतितोळा भाव 5500 रुपयांनी घसरला, 10 ग्रॅम सोन्याचा आजचा भाव किती?

अधिक पाहा..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.