पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला होता, या हल्ल्यामध्ये 26 जणांना आपला जीव गमवावा लागला तर अनेक जण जखमी झाले होते. त्यानंतर भारतानं पाकिस्तानवर मोठी कारवाई केली, भारतानं पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केला, भारताच्या या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांचे 9 अड्डे उद्ध्वस्त झाले, या हल्ल्यामध्ये 100 पेक्षा अधिक दहशतवादी मारले गेले. विशेष म्हणजे पाकिस्तानमधीलच एक राज्य असलेल्या बलुचिस्तानने भारताच्या या कारवाईचं समर्थन केलं होतं, तसेच जेव्हा भारतानं पाकिस्तानवर हल्ला केला, त्यानंतर बलुच आर्मीकडून देखील पाकिस्तानच्या सैन्य तळांना लक्ष्य बनवण्यात आलं.
पाकिस्तानमध्ये बलुचिस्तानवर अन्याय होत असल्याचा आरोप येथील जनतेकडून करण्यात आला आहे, त्यामुळे बलुचिस्तानमधील जनतेकडून आता वेगळ्या बलुचिस्तानची मागणी जोर धरू लागली आहे, या सर्व पार्श्वभूमीवर बलुच आर्मीकडून पाकिस्तानी सैन्यांविरोधात कारवाया सुरू आहेत. बलुच आर्मीने काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानमधील एका ट्रेनचं अपहरण देखील केलं होतं. बलुचिस्तानमधील बंडखोरांकडून सातत्यानं पाकिस्तानी आर्मीवर हल्ल्याचा प्रयत्न केला जात आहे. पाकिस्तानमध्ये आतापर्यंत झालेल्या 51 हल्ल्याची जबाबदारी बलुचिस्ताननं स्वीकारली आहे.
पाकिस्तानी सैन्याच्या नाकीनऊ आणणाऱ्या या बलुच आर्मीकडे 6 हजार लोकांची फौज आहे. वेगळा बलुचीस्तान हीच या लोकांची मागणी आहे. दरम्यान बलुचिस्तान हे पाकिस्तानमध्ये असलेल्याच चार राज्यांपैकी सर्वात मोठं राज्य आहे. बलुचिस्तानचं एकूण क्षेत्रफळ हे संपूर्ण पाकिस्तानच्या तुलनेत 43 टक्क्यांच्या आसपास आहे, जर समजा बलुचिस्तान पाकिस्तानमधून बाहेर पडलं तर पाकिस्तानचा जवळपास अर्धा भाग कमी होणार आहे.