सौरव गांगुलीसोबत भांडण झाल्यानंतर विराट कोहलीच्या करिअरला उतरती कला? जाणून कसं काय घडलं ते
GH News May 14, 2025 09:08 PM

विराट कोहली हे भारतीय क्रिकेट विश्वातील मोठं नाव…विराट कोहलीने 2011 साली कसोटी क्रिकेटमध्ये पाऊल ठेवलं होतं. विराट कोहलीने 14 वर्षे कसोटी क्रिकेटवर राज्य गाजवलं आणि 12 मे 2025 रोजी निवृत्ती जाहीर केली. विराट कोहलीने कसोटी क्रिकेटला अचानक रामराम ठोकल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. याबाबत क्रिकेट तज्ज्ञांनी आपली मतं मांडली आहेत. अनेकांनी खराब फॉर्म असल्याने निवृत्ती घेतल्याचं सांगितलं आहे. पण तुम्हाला माहिती आहे का? विराट कोहलीच्या कसोटी क्रिकेट कारकि‍र्दीला उतरती कला कधी लागली? सौरव गांगुलीसोबत वाद झाल्यानंतर विराट कोहलीच्या करिअरला ग्रहण लागलं असं क्रीडाप्रेमी म्हणत आहेत. सौरव गांगुली 2021 मध्ये बीसीसीआय अध्यक्ष होता. तेव्हा गांगुली आमइ विराट कोहली यांच्यात वाद झाला होता. त्यावेळी विराट कोहलीचं कर्णधारपद गेलं, तसेच त्याच्या कारकि‍र्दीला ग्रहण लागलं आहे. त्यानंतर 12 मे 2025 रोजी निवृत्ती जाहीर केली. चला जाणून घेऊयात या वादानंतर नेमकं काय घडलं ते…

गांगुलीसोबत वाद होण्यापूर्वी विराटचा दबदबा

सौरव गांगुलीसोबत वाद होण्यापूर्वी विराट कोहलीचं क्रिकेट करिअर जोमात होतं. प्रत्येक फॉरमेटमध्ये त्याने नाव कमावलं होतं. त्यानंतर विराट कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडियाची कामगिरीही जबरदस्त राहिली. 2019 पर्यंत त्याने कसोटी क्रिकेटमध्ये राज्य केलं. त्याने या काळात खोऱ्याने धावा केल्या. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण अफ्रिका, वेस्ट इंडिज या सारख्या दिग्गज संघांविरुद्ध धावा केल्या. विशेष म्हणजे विराट कोहलीने 2016 ते 2019 या काळात सात द्विशतकं ठोकली. त्याच्या कर्णधारपदाच्या कारकिर्दीत भारताने होमग्राउंडवर एकही सामना गमावला नाही. ऑस्ट्रेलिया त्यांच्याच भूमीवर नमवलं. इंग्लंड आणि दक्षिण अफ्रिकेला त्यांच्याच पराभवाचं पाणी पाजलं. विराट कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडिया 68 कसोटी खेळली. त्यात 40 विजय आणि 17 सामन्यात पराभवाचं तोंड पाहीलं. तर 11 सामने ड्रॉ झाले.

विराट कोहलीच्या करिअरचा ग्राफ 2021 मध्ये उतरला. 2021 पासून 2025 वर्षापर्यंत म्हणजेच मागच्या चार वर्षात फक्त 4 शतकं ठोकता आली. 2021 नंतर 35 सोटीत त्याने 32.56 च्या सरासरीने 1889 धावा करू शकला.

गांगुलीसोबत वादाची पूर्ण कहाणी

सौरव गांगुली ऑक्टोबर 2019 मध्ये बीसीसीआयचा अध्यक्ष झाला. विराट कोहलीने वर्कलोडचा संदर्भ देत 2021 मध्ये टी20 वर्ल्डकपनंतर या फॉर्मेटच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला. पण वनडे आणि कसोटीचं कर्णधारपद राखलं होतं. गांगुलीला ही गोष्टी काही आवडली नाही. बोर्डाने काही आठवड्यानंतर रोहित शर्माला वनडे कर्णधार घोषित केलं. यावेळी बोर्डाने काहीच कारण सांगितलं नाही. फक्त एका ओळीत नव्या कर्णधाराची माहिती दिली होती.

गांगुलीने दावा केला की, विराट कोहलीला कर्णधारपद सोडू नको यासाठी विनवणी केली होती. बोर्डाला व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये दोन कर्णधार हवे होते. यासाठी निर्णय घेतला. पण डिसेंबर 2021 मध्ये कोहलीने गांगुलीचा दावा खोडून काढला. त्याने सांगितलं की, कसोटी संघाच्या निवडीपूर्वी 90 मिनिटाआधी वनडे कर्णधारपद काढल्याची माहिती दिली गेली होती.

विराटने मीडियासमोर थेट म्हणणं मांडल्याने बोर्ड आणि गांगुली नाराज होता. यानंतर दक्षिण अफ्रिकोत भारताने कसोटी मालिका गमावली. त्यानंतर कोहलीने कसोटीचं कर्णधारपद सोडलं. पाच महिन्यात विराटने तिन्ही फॉरमेटचं कर्णधार गमावलं होतं. आयपीएल 2023 स्पर्धेतही विराट कोहली आणि गांगुलीच्या वादाच्या चर्चा समोर आल्या. सामन्यानंतरच्या कार्यक्रमात विराटने गांगुलीकडे दुर्लक्ष केलं होतं. इतकंच काय इंस्टाग्राम अनफॉलोही केलं होतं.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.