- rat१४p१३.jpg-
२५N६३६९२
रत्नदुर्ग किल्ला
---
रत्नदुर्ग किल्यावर ‘लिफ्ट’ बसवणार
उदय सामंत ः दिव्यांग, ज्येष्ठांना दिलासा, १ कोटी मंजूर
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १४ ः रत्नागिरी शहरातील रत्नदुर्ग किल्ला पाहण्यासाठी पर्यटकांची नेहमीच गर्दी असते. या किल्ल्यावर चढण्यासाठी पायऱ्यांची व्यवस्था आहे; परंतु दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक यांना वर जाणे काहीवेळ शक्य होत नाही. किल्ल्यावर भगवतीदेवीचे मंदिर असून, तिथे दर्शनासाठी जाणे शक्य होत नाही. त्यांच्यासाठी भगवती किल्ल्यावर लिफ्ट बसवण्यात येणार आहे. या कामासाठी पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हा नियोजनमधून १ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
रत्नागिरीतील मुख्य बसस्थानकाच्या नूतन इमारतीच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी पालकमंत्री सामंत यांनी रत्नदुर्ग किल्ल्यावर दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी लिफ्ट बसवण्यात येणार असल्याचे सांगितले. या वेळी सामंत म्हणाले की, राजापूर तालुक्यातील धूतपापेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी १२ कोटी रुपये, कसबा संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराजांचे जागतिक स्तरावरील स्मारकासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्याच धर्तीवर रत्नागिरीतील रत्नदुर्ग किल्ल्यावर जाण्यासाठी लिफ्टची व्यवस्था केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. इतिहासाची साक्ष देणाऱ्या रत्नदुर्ग किल्ल्यावर भगवतीचे मंदिर आहे. येथे दसऱ्यामध्ये विविध कार्यक्रम साजरे केले जातात. जिल्ह्याच्याच नव्हे तर राज्याच्या कानाकोपऱ्यातून येथे पर्यटक भेट देण्यासाठी येतात. उन्हाळी सुटीमध्येही पर्यटकांची गर्दी असते. अनेकवेळा ज्येष्ठ नागरिक किल्ल्यावर जाऊ शकत नाहीत. त्यांची गैरसोय लक्षात आल्यानंतर लिफ्टची सुविधा देण्याचा निर्णय घेतल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितले.