हिंगणघाट : माध्यमिक शालांत परीक्षेत नवकेतन विद्यालयातील आजी आणि नातू तसेच आई आणि मुलगी यांनी मिळून यश संपादन करत एक प्रेरणादायी उदाहरण समाजासमोर ठेवले आहे.
जामणी येथील नवकेतन विद्यालयात शिक्षण घेत असलेल्या धीरज लक्ष्मण बोरकर या विद्यार्थ्याने शालांत परीक्षेत उल्लेखनीय असे ७५.६० टक्के गुण मिळवले आहेत. विशेष बाब म्हणजे, याच धीरज यांच्या आजी, इंदू ज्ञानेश्वर बोरकर या ७० वर्षीय महिलेने देखील अभ्यास करत ५१.०० टक्के गुण मिळवून परीक्षेत यश मिळवले आहे. इंदूबाईंच्या या जिद्दीला आणि चिकाटीला सर्वत्र सलाम केला जात आहे. त्यांनी वयाच्या या टप्प्यावर शिक्षण पूर्ण करून समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे.
याच विद्यालयात शिक्षण घेत असलेली सोनाली आत्माराम भागानगरे हिने देखील ७० टक्के गुण मिळवून आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. विशेष म्हणजे सोनाली सोबत तिच्या आई, चंदा आत्माराम भागानगरे (रा. डायगव्हाण, हेट्टी) यांनी देखील ४३ टक्के गुण मिळवत शालांत परीक्षेची पायरी यशस्वीरीत्या ओलांडली आहे.
आर्थिक अडचणींमुळे शिक्षण अर्धवट राहिलेल्या चंदाबाईंनी प्रथम एज्युकेशन फाउंडेशनच्या मार्गदर्शनाखाली बहिःशाल विद्यार्थी म्हणून परीक्षेला बसण्याचा निर्णय घेतला होता. या आजी-नातू आणि आई-मुलगी यांनी भारत विद्यालय वेळा या केंद्रावरून एकत्रितपणे परीक्षा दिली आणि चौघांनीही यश मिळवून दाखवले.
नवकेतन विद्यालयाचे मुख्याध्यापक कलोडे, भारत विद्यालयाचे मुख्याध्यापक खडतकर, वाघोली केंद्राचे केंद्रप्रमुख सुरपाम तसेच इटेकर , भुते , हुलके आणि जामणी गावातील सर्व नागरिकांनी या यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या जिद्दी पालकांचे अभिनंदन केले आहे. या अनोख्या यशाबद्दल सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.