अक्षय बडवे, पुणे प्रतिनिधी
Ajit Pawar setback Pune, Deepak Mankar resignation : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार यांना पुण्यात मोठा धक्का बसलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष दीपक मानकर यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. मनपा निवडणुकीच्या तोंडावर मानकर यांन अजित पवार यांच्याकडे राजीनामा दिला आहे.
राजकीय बदनामी होत असल्याच्या त्रासाला कंटाळून यांनी राजीनामा दिला आहे. राजकीय कारकीर्द मलीन करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याच्या आरोप त्यांनी राजीनामा देताना केला आहे. काही दिवसांपूर्वी जमिनीच्या आर्थिक व्यवहारात अपहार केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी त्यांच्यावर दाखल केला होता. हा गुन्हा सत्यता न पडताळता केल्याचा आरोप मानकर यांनी केला आहे.
मानकर यांच्या राजीनाम्यात नेमकं काय लिहिले आहे?
काही वर्षांपूर्वी केलेल्या जमिनीच्या आर्थिक व्यवहारात आता ३-४ दिवसांपूर्वी या जमिनीच्या आर्थिक व्यवहारात शासनाची फसवणूक केली असल्याचा माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. परंतु हा गुन्हा अजून सिद्ध झालेला नाही. सदर गुन्ह्यातील सत्यता न पडताळता येणाऱ्या महानगपालिका निवडणूक तसेच माझे राजकीय कारकीर्द मलीन करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. सदर आर्थिक व्यवहार हा माझ्या जमिनीसंदर्भात झालेला असून त्यामध्ये माझ्याकडून कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार किंवा फसवणुकीचा प्रकार झालेला नाही.
या प्रकरणामुळे आपल्या पक्षाची व आपली नाहक बदनामी होत असून त्यामुळे पक्षश्रेष्ठींना अनेक गोष्टींना सामोरे जावे लागत आहे. आदरणीय दादा, आपण आणि प्रदेशाध्यक्ष खा.श्री.सुनील तटकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ताकद कायम ठेवण्यासाठी मी अध्यक्ष झाल्यापासून प्रामाणिक प्रयत्न करीत आलेलो आहे. तरी आपणास नम्र विनंती करतो की, माझा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर अध्यक्ष पदाचा राजीनामा मंजूर करण्यात यावा.