इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आत्तापर्यंत दमदार कामगिरी केली आहे. बंगळुरूने ११ सामन्यांपैकी ८ सामने जिंकले असून ३ सामने पराभूत झाले आहेत. त्यामुळे त्यांचे १६ गुण असून ते दुसऱ्या क्रमांकावरही आहे. त्यामुळे बंगळुरूचे प्लेऑफमधील स्थानही जवळपास पक्के मानले जात आहे.
असे असताच २०२५ स्पर्धा ९ मे रोजी स्थगित झाली. त्यानंतर आता भारत - पाकिस्तान यांच्यातील तणाव कमी झाल्यानंतर पुन्हा १७ मे पासून आयपीएल २०२५ला सुरुवात होणार आहे. मात्र आता आयपीएल पुन्हा सुरू होत असताना बंगळुरूला मोठे धक्के बसणार आहेत.
कर्णधार रजत पाटिदारच्या हाताच्या बोटाला ३ मे रोजी चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध खेळताना दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला काही दिवस न खेळण्याचा वैद्यकिय सल्ला मिळाला होता. त्यामुळे बंगळुरूने काही सामन्यांसाठी जितेश शर्माकडे नेतृत्व देण्याचा विचारही केला होता.
पण आयपीएल स्थगित झाल्याने पाटिदारला आरामासाठी वेळ मिळाला आहे. पण असे असले तरी तो आता पुन्हा स्पर्धा सुरू झाल्यानंतरही किमान दोन सामन्यांना मुकण्याची किंवा केवळ इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळण्याची शक्यता आहे.
याशिवाय बंगळुरूचा प्रमुख गोलंदाज जोश हेजलवूडला खांद्याची छोटी दुखापत आहे. तसेच तो स्थगितीनंतर ऑस्ट्रेलियाला परत गेला आहे. त्याचबरोबर त्याला ११ जूनपासून होणारा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप २०२५ चा अंतिम सामनाही ऑस्ट्रेलियाकडून खेळायचा आहे. त्यामुळे तो आयपीएल २०२५ साठी परत येण्याची शक्यता कमी आहे. त्याने १० सामन्यांत १८ विकेट्स घेतल्या आहेत.
त्याचबरोबर मधल्या फळीतील फलंदाज देवदत्त पडिक्कल हा देखील आयपीएल स्थगित होण्यापूर्वीच दुखापतीमुळे आयपीएल २०२५ मधून बाहेर झाला आहे. त्याच्याऐवजी बंगळुरूने बदली खेळाडू म्हणून मयंक अगरवालला संधी दिलेली आहे.
आता बंगळुरूला आणखी एक धक्का बसू शकतो. आक्रमक खेळणाऱ्या रोमरियो शेफर्डला राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी परत जावे लागू शकते. वेस्ट इंडिजला २१ मे ते २५ मे दरम्यान वनडे मालिका झिम्बाब्वेविरुद्ध खेळायची आहे.
त्यानंतर २९ मे ते १० जून दरम्यान इंग्लंडविरुद्ध वनडे आणि टी२० मालिका खेळायची आहे. आयपीएल २०२५ सुधारित वेळापत्रकानुसार ३ जूनपर्यंत चालणार आहे. त्यामुळे आता त्याला वेस्ट इंडिजकडून आयपीएलमध्ये खेळण्यासाठी परवानगी मिळणार का, हे पाहावे लागणार आहे.
याशिवाय फिल सॉल्ट,जेकॉब बेथल आणि लियाम लिव्हिंगस्टोन या इंग्लंडच्या खेळाडूंबाबातही हीच समस्या आहेत. त्यांनाही राष्ट्रीय संघाप्रती असलेली वचनबद्धता पाळावी लागण्याची शक्यता आहे. त्यांना इंग्लंडसाठी वेस्ट इंडिजविरुद्ध खेळायला जावं लागू शकतं. यापूर्वी आयपीएल २५ मे पर्यंत होतं. त्यामुळे हे खेळाडू पूर्ण उपलब्ध होते. मात्र आता बदललेल्या वेळापत्रकामुळे समस्या निर्माण झाल्या आहेत.
आता यातून बंगळुरू संघ कसा मार्ग काढणार आहे हे पाहावे लागणार आहे. बंगळुरू संघाला गेल्या १८ वर्षांपासून आयपीएल विजेतेपदाची प्रतिक्षा आहे. त्यांना तीनवेळा विजेतेपदाने हुलकावणी दिली आहे.
२००९, २०११ आणि २०१६ या तीन हंगामात बंगळुरूने अंतिम सामन्यात प्रवेश केला होता. पण त्यांना पराभवाचा धक्का बसल्याने उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले आहे. आता ते पहिल्यांदा विजेतेपद मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत.