BSF Soldier : पाकच्या ताब्यातील जवानाची सुटका होणार, 'डीजीएमओ'स्तरीय चर्चेमुळे कुटुंबीयांच्या मनात आशेचा किरण
esakal May 15, 2025 03:45 AM

रिशरा : आंतरराष्ट्रीय सीमा अनवधानाने ओलांडल्यानंतर पाकिस्तानने ताब्यात घेतलेल्या सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानाच्या सुटकेसाठी त्याची पत्नी प्रयत्न करत आहे. दरम्यान, शस्त्रसंधीनंतर भारत आणि पाकिस्तानच्या लष्करी कारवाई विभागाच्या महासंचालकांमधील (डीजीएमओ) चर्चेमुळे या जवानाच्या सुटकेसाठी आशेचा किरण दिसू लागला आहे.

मूळ प. बंगालचा व पंजाबमधील फिरोजपूरमध्ये असलेल्या कॉन्स्टेबल पूरमकुमार साहू (वय ४०) या जवानाने २३ एप्रिल रोजी अनवधानाने आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडल्यानंतर पाकिस्तानने त्याला ताब्यात घेतले होते. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या दुसऱ्याच दिवशी ही घटना घडली होती. या हल्ल्यानंतर भारताने दहशतवाद्यांविरुद्ध राबविलेले ‘ऑपरेशन सिंदूर’ व त्यानंतरच्या चकमकींमुळे दोन्ही देशांत चांगलाच तणाव निर्माण झाला होता. अखेरीस भारताच्या भेदक माऱ्यापुढे गुडघे टेकलेल्या पाकिस्तानने शस्त्रसंधीचा प्रस्ताव दिला.

त्यानुसार शस्त्रसंधी झाल्याने हा तणाव निवळला. पाकिस्तानी अधिकाऱ्यांकडून यासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती मिळत नसल्याने साहूच्या कुटुंबाला लष्करी स्तरावरील चर्चेकडून आशा आहेत. जवान साहूची पत्नी रजनी म्हणाल्या, ‘‘मी पतीच्या सुटकेसाठी नेत्यांच्याही भेटीगाठी घेत असून पठाणकोट व फिरोजपूरमध्येही बीएसएफच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. पठाणकोटहून परतल्यानंतर माझे पती लवकरच परततील, अशी आशा होती. भारतीय हद्दीतही पाकच्या जवानाला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर पतीच्या लवकर सुटकेची आशा होती, मात्र काहीही घडले नाही. दोन्ही देशांमध्ये जवानांची अदलाबदल होणे शक्य आहे.’’

त्या म्हणाल्या, की याबाबत प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशीही संवाद साधला असून बॅनर्जी यांनी रविवारी (ता.११) संध्याकाळी दूरध्वनीवरुन संपर्क साधला. त्यांनी पतीला परत आणण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. तसेच माझ्य प्रकृतीची विचारपूस करत गरज भासल्यास सासू-सासऱ्यांना सरकारतर्फे वैद्यकीय मदतीचे आश्वासनही दिले. भारत व पाकिस्तानच्या डीजीएमओमध्ये सोमवारी (ता.१२) विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. त्यामुळे, साहूच्या सुटकेला चालना मिळण्याची आशा आहे.

माझे पती पाकिस्तानात असण्याव्यतिरिक्त गेल्या २० दिवसांपासून इतर कोणतीही माहिती मिळाली नाही. भारत व पाकिस्तानच्या ‘डीजीएमओ’मध्ये चर्चा होत असल्याने हा मुद्दा उपस्थित केला जाईल, अशी आशा आहे.

- रजनी, जवानाची पत्नी

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.