समतोलाने जगा
esakal May 15, 2025 02:45 PM

- अश्विनी आपटे- खुर्जेकर, व्यक्तिमत्त्वविषयक सल्लागार

आजकालच्या धकाधकीच्या आणि गतिमान जीवनशैलीत महिलांकडून अनेक भूमिका निभावल्या जात आहेत. कामाच्या जबाबदाऱ्या आणि घरगुती कर्तव्यं यामुळे स्त्रियांची अनेकदा मोठी कसरत होते. कामाच्या ठिकाणी असलेला वेळेचा दबाव, डेडलाईनमध्ये काम पूर्ण करण्याचं प्रेशर, सतत काम योग्य करण्याची अपेक्षा, कामाची अस्थिरता, मानसिक थकवा आणि बरेचदा जोडीदार, कुटुंब किंवा सहकाऱ्यांकडून अपेक्षित सहकार्य न मिळाल्यामुळे, स्त्रियांना बरेचदा मानसिक ताणाला सामोरं जावं लागतं आणि या सगळ्या जबाबदाऱ्यांमुळे मैत्रिणींनो आपण स्वतःसाठी वेळ काढणं, मानसिक आणि शारीरिक आरोग्य सांभाळणं याला अनेक वेळेला कमी प्राधान्य देतो. त्यामुळेच आपला ‘वर्क लाइफ बॅलन्स’ म्हणजेच काम आणि खासगी आयुष्य यामधील समतोल बिघडतो.

काम आणि खासगी आयुष्यामध्ये समतोल असणं का महत्त्वाचं आहे?

1) काम आणि घर या आघाड्यांवर यशस्वी होण्यासाठी

2) मानसिक तणाव कमी करण्यासाठी

3) वैयक्तिक नात्यांमधील संघर्ष कमी करण्यासाठी

4) स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी

5) आत्मविश्वास आणि समाधान टिकवण्यासाठी

वर्क-लाइफ बॅलन्स केवळ नोकरी करणाऱ्या महिलांसाठीच नाही – हा समतोल प्रत्येक महिलेसाठी आवश्यक आहे, मग ती गृहिणी असो, उद्योजिका, विद्यार्थिनी, आई, किंवा केअरगिव्हर!

काही उपयुक्त टिप्स

दिवसाचं वेळापत्रक ठरवा आणि त्याचं काटेकोर पालन करण्याचा प्रयत्न करा. दिवसातील वेळाचं योग्य प्रकारे नियोजन केल्यामुळे गरजेपेक्षा जास्त वेळ एका गोष्टीत वाया न जाता काम आणि वैयक्तिक आयुष्यात समतोल राखता येतो. तसंच दिवसातला ठरावीक वेळ स्वतःसाठी, कुटुंबासाठी आणि विश्रांतीसाठी राखून ठेवता येतो, वेळेचं नियोजन चांगलं केलं, तर कामाची गुणवत्ता वाढते आणि आपण अधिक समाधानी राहतो.

प्राधान्य ठरवा : आपला वेळ आणि ऊर्जा मर्यादित असल्यामुळे कोणतं काम अत्यावश्यक आहे आणि कोणतं काम महत्त्वाचं नाही हे ठरवणं गरजेचं आहे. प्राधान्य ठरवल्यामुळे महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करता येतं आणि अनावश्यक कामांचा ताण टाळता येतो.

मदत मागण्यात संकोच करू नका : जबाबदाऱ्या पार पाडताना अनेकदा आपली तारेवरची कसरत होते. अशा वेळेला मैत्रिणींनो, कुटुंब, मित्र, सहकारी यांना विनासंकोच मदत मागा. त्यांचा आधार घ्या. घरातल्या आणि कामाच्या दोन्हीकडच्या जबाबदाऱ्या वाटून घ्या.

तंत्रज्ञानाचा वापर हुशारीनं करा : तंत्रज्ञानाच्या मदतीनं कामं जलद, सोप्या पद्धतीनं आणि विनासायास करता येतात. वेगवेगळ्या टूल्स आणि ॲप्सच्या मदतीने तुम्ही कामाचा तणाव कमी करू शकता.

परिपूर्णतेचा हट्ट सोडा : परिपूर्णतेच्या मागे धावल्यानं आपल्यावर अधिक ताण येतो आणि जीवनातील आनंद कमी होतो. प्रत्येक गोष्ट परफेक्ट करण्याच्या प्रयत्नात वेळ निघून जातो आणि आपल्याला आवश्यक असलेला विश्रांती, आत्मपरीक्षण आणि कुटुंबासोबतचा वेळ कमी होतो. परिपूर्णतेऐवजी प्रॅक्टिकल आणि व्यावहारिक दृष्टिकोन ठेवून काम पूर्ण करणं अधिक फायदेशीर ठरू शकतं.

अनावश्यक गोष्टी दुसऱ्यांकडून करून घ्या : तुमच्यासाठी महत्त्वाच्या नसलेल्या कामांसाठी दुसऱ्याची मदत घ्या. यामध्ये घरकाम, ऑफिसचं दैनंदिन काम, किंवा इतर सहायक कार्यं समाविष्ट असू शकतात. यामुळे तुमच्याकडे महत्त्वाच्या कार्यांसाठी अधिक वेळ मिळतो आणि तुमचा ताण कमी होतो.

फक्त नोकरी व्यवसाय करणाऱ्या महिलांनीच नाही, तर गृहिणींनीही जीवनात समतोल साधण्याचा प्रयत्न करणं आवश्यक आहे. सर्व आघाड्यांवर यश मिळवण्यासाठी मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या समर्थ असणं खूप महत्त्वाचं आहे. वर्क-लाइफ बॅलन्स राखण्यासाठी वेळेचं नियोजन, प्राधान्य ठरवणं, तंत्रज्ञानाचा वापर, आणि परिपूर्णतेचा हट्ट सोडणं आवश्यक आहे. तसंच, आऊटसोर्सिंग किंवा अनावश्यक काम दुसऱ्यांकडून करून घेणे यामुळे महिलांना अधिक वेळ मिळतो आणि त्यांना काम आणि वैयक्तिक आयुष्य यामधील संतुलन साधता येते. वर्क-लाइफ बॅलन्समुळे महिलांना आनंद, संतोष आणि मानसिक शांती मिळते, जी त्यांचं एकूणच जीवन अधिक समृद्ध, तणावमुक्त बनवते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.