टुधी नोबेल फौंडेशन, १४, स्टुरेगाताँ स्ट्रीट, स्टॉकहोम, स्वीडन
हे देअर, तुम्ही मला ओळखता, पण मी तुम्हाला ओळखत नाही. नोबेल प्राइझ मिळण्यासाठी काय करावं लागेल, असं मी माझ्या एका इंडियन मित्राला विचारलं होतं, तेव्हा त्याने ‘नोबेल कमिटीला पत्र टाका’ असा सल्ला दिला. आमच्या ‘सीआयए’च्या एजंटाने तुमचा पत्ता काढून दिला, म्हणून हे पत्र लिहित आहे.
मला असं वाटतं की सध्याच्या काळात (आय मीन गेली आणि पुढली दोनेक हजार वर्ष) माझ्याइतका लायक उमेदवार तुम्हाला मिळणं अशक्य आहे. यंदाचं शांततेचं नोबेल मलाच मिळालं पाहिजे, हे तुम्हाला कोणीही सांगणार नाही, पण तेच सत्य आहे. मी एकट्यानं गेल्या काही दिवसात मिनिमम चार अणुयद्धे नुसत्या फोन कॉलवर थांबवली आहेत, याच्यावर तुमचा विश्वास आहे का? बट दॅट्स द ट्रुथ !!
परवाच मी इंडिया-पाकिस्तानमधलं संभाव्य अणुयुद्ध रोखलं. या दोन्ही देशांचे नेते माझे दोस्त आहेत. मी त्यांना सांगितलं, ‘कश्शाला उगाच भांडता, तुम्ही शेजारी आहात. विरजण एकमेकांच्या घरी पाठवण्याऐवजी मिसाइल्स कसल्या पाठवता? नॉन्सेन्स. तुम्ही भांडण ( पक्षी : वॉर) थांबवलंत तर मी तुम्हाला चिक्कार बिझनेस देईन.
पैसे कमवा, आपण मस्तपैकी जेवू, पार्टी करु!’ आणि आश्चर्य म्हणजे बोथ द पार्टीज अग्रीड इन्स्टण्टली! पाकिस्तानच्या पीएमनं तर मला ‘कधी बसूया?’ असं विचारलंसुद्धा. शाहबाझ अतिशय फुकट्या आहे, कधीही लेकाचा बिल भरत नाही. उलट सारखे उसने मागत असतो. मीसुद्धा कमी नाही. त्यानं पन्नास मागितले की मी पाचच देतो. इंडियाचं तसं नाही. ते उधारी मागत नसले तरी समोर आले की मिठी वगैरे मारतात. दॅट इज बिट टू मच. बट स्टिल आय लाइक हिम.
हा ॲटॉमिक क्रायसिस (चुटकीसरशी) सोडवण्यापूर्वी मी युक्रेन आणि रशियामधला ‘न्यूक्लिअर क्रायसिस’ही आरामात सोडवला होता. व्लादिमीर पुतीनला मी जरा प्रेमानं चुचकारलं, आणि युक्रेनच्या झेलेन्स्कीला झाप झाप झापला!! अगदी चार चौघात इज्जत काढली! तेव्हापासून त्याच्या देशातही त्याला ‘झापिन्स्की’ असं चिडवतात म्हणे. जाऊ दे. मी क्रायसिस सोडवला हे महत्त्वाचं.
त्याच्यापूर्वी मी इस्राईलला रोखलं, आणि ‘हमास’च्या दहशतवाद्यांशीही मांडवली करुन एका ओलिस मुलाला सोडवलं होतं. तेव्हाही मी दोघांना ‘ॲटमबॉम्ब नका रे फोडू, मराल’ असं बजावायला विसरलो नाही. असे कितीतरी प्रसंग आहेत. मी अमेरिकेचा प्रेसिडेण्ट झाल्यापासून फक्त हेच उद्योग करत आहे. मग सांगा, शांततेच्या नोबेल पुरस्कारावर माझा हक्क नाही का? मला तो द्या. मी स्वीडनलाही भरपूर बिझनेस देईन! डील? आपका अपना. डोनाल्ड ट्रम्प. (अमेरिका फर्स्ट.)
डिअर मि. डोनाल्ड, तुमचे पत्र मिळाले. पत्र पाठवून आपण आमचा सन्मान केलात, त्याबद्दल आभार! तुमचे उपकार ही संपूर्ण पृथ्वीच नव्हे तर अवघी सूर्यमालिका विसरु शकणार नाही. तुम्हाला देता येईल, या आकाराचे नोबेलप्राइझ आमच्याकडे नाही. असते तर नक्की दिले असते, पण दुर्दैवाने आम्ही फक्त विज्ञान, तंत्रज्ञान, साहित्य वगैरे सटरफटर नोबेल पुरस्कार तेवढे देतो.
शांततेचे नोबेल हवे असल्यास ‘नोबेल पीस प्राइझ कमिटी, ब्रिन्युफ बुल्स प्लास, १, ०२५० ऑस्लो, नॉर्वे’ यांच्याशी संपर्क साधावा. तेच हे प्राइझ देतात. (आपल्या माहितीसाठी : ऑस्लो ही नॉर्वे या देशाची राजधानी आहे!) कृपया राग मानू नये. आपले आज्ञाधारक आणि विनम्र नोबेल फौंडेशन, स्वीडन.