भारतीय संघ जून महिन्यात कसोटी मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या मालिकेसाठी अजूनही संघ जाहीर केलेला नाही. पण इंग्लंड दौऱ्यापूर्वी कर्णधारपदाचा पेच असल्याचं दिसून येत आहे. कारण रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी कसोटी क्रिकेटला रामराम ठोकल्याने शोधाशोध सुरु झाली आहे. शुबमन गिल आणि जसप्रीत बुमराह यांचं नाव कसोटी कर्णधारपदाच्या शर्यतीत आहे. बुमराहची दुखापत पाहता ही जबाबदारी शुबमन गिलच्या खांद्यावर येण्याची शक्यता आहे. पण भारताचा माजी क्रिकेटपटू आर अश्विनने कर्णधारपदासाठी अनुभवी खेळाडूचं नाव सूचवलं आहे. आर अश्विनने स्पष्ट केलं की, रोहित-कोहलीच्या निवृत्तीनंतर संघातील सर्वात अनुभवी खेळाडूकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली होती. आर अश्विनने पत्रकाराशी बोलताना सांगितलं की, 25 वर्षीय गिलवर इतकं प्रेशर टाकणं योग्य ठरणार नाही. इतकंच काय तर रवींद्र जडेजा हा संघातील अनुभवी खेळाडू असून त्याच्याकडे जबाबदारी सोपवली जावी, असं सांगितलं.
आर अश्विनने सांगितलं की, ‘संघात सर्वात अनुभवी खेळाडू हा रवींद्र जडेजा आहे. जर तुम्ही नव्या खेळाडूला ट्रेन करू इच्छित असाल तर दोन वर्षासाठी रवींद्र जडेजाकडे जबाबदारी सोपवा. जडेजा दोन वर्षे संघाची धुरा सांभाळू शकतो. तसेच शुबमन गिलला उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवा.’ प्रत्येक खेळाडूचं भारतीय संघाचं कर्णधारपद भूषवण्याचं स्वप्न असतं. अशा स्थितीत रवींद्र जडेजा ही भूमिका आवडीने स्वीकारू शकतो. जडेजाकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्याच आग्रह नाही. पण त्याच्याकडे कर्णधारपद सोपवल्याने काही नुकसान पण होणार नाही.
आयसीसीने नुकत्याच जाहीर केलेल्या कसोटी अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत रवींद्र जडेजा अव्वल स्थानी आहे. दीर्घकाळापासून त्याने हे स्थान काबिज केलं आहे. रवींद्र जडेजा 2012 पासून कसोटी क्रिकेट खेळत आहे. 13 वर्षांच्या कारकिर्दीत त्याने गोलंदाजी आणि फलंदाजीत अनेक सामने जिंकवले आहेत. दुसरीकडे, रवींद्र जडेजाने आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सचं कर्णधारपद भूषवलं आहे. त्याच्या नेतृत्वात संघाची कामगिरी निराशाजनक राहिली होती. त्याने कर्णधारपद सोडलं होतं. त्यामुळे तो कर्णधारपद स्वीकारेल की नाही याबाबत शंका आहे.