शाहूनगर पादचारी पूल खुला
धारावी, ता. १५ (बातमीदार) : माहीम-धारावीला जोडणारा शाहूनगर पूल रेल्वे प्रशासनाने नूतनीकरणासाठी गेल्या काही दिवसांपासून बंद केला होता. त्यामुळे शाहूनगर, माटुंगा लेबर कॅम्प, अन्नानगर, कुंभारवाडा आदी धारावीतील प्रवाशांना व पादचाऱ्यांना स्थानकाला वळसा घालून स्थानकात जावे लागत होते. याबाबत ‘सकाळ’च्या २२ एप्रिलच्या अंकामध्ये वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. याची दखल घेत रेल्वे प्रशासनाने जलद गतीने पुलाचे काम पूर्ण केले आहे. शाहूनगर पादचारी पूल खुला केल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
पुलावरून माहीम स्थानकाकडे जाण्यासाठी व माहीम पश्चिमेला असलेल्या मोरी रोड पालिका शाळा, पालिकेची मुलींची उर्दू शाळा, सेंट मायकल हायस्कूल, के. जे. खिलनानी हायस्कूल व कनिष्ठ विद्यालय, सेंट मायकल चर्च, माहीम दर्गा, शितळादेवी आदी ठिकाणी जाण्यासाठी हजारो नागरिक या पुलाचा दररोज वापर करतात. लहान मुले, विद्यार्थी, वृद्ध, गरोदर महिला, रुग्ण, ज्येष्ठ नागरिक यांना गेल्या काही दिवसांपासून त्रास सहन करावा लागत होता.